खत गुणवत्तेच्या अहवालासाठी ५० हजारांची लाच घेताना सातारा येथील कृषी अधिकारी जाळ्यात; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

कारवाईमुळे जिल्हा परिषद आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर

by Team Satara Today | published on : 23 March 2026


​सातारा : कृषी कंपनीतील खत व औषधांच्या गुणवत्तेचा प्रतिकूल अहवाल न देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना सातारा येथील कृषी अधिकारी युवराज अन्याबा काटे (वय ५४) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज रंगेहात पकडले. या कारवाईमुळे जिल्हा परिषद आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला असून संपूर्ण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

​तक्रारदार यांची कृषी कंपनी असून तिथे तयार होणाऱ्या खत आणि औषधांच्या गुणवत्तेची तपासणी केल्यानंतर त्याचा अहवाल कंपनीच्या विरोधात पाठवू नये, यासाठी गुण नियंत्रण अधिकारी असलेले युवराज काटे यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याप्रकरणी सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार दाखल केली. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत विभागाने तातडीने पडताळणी सुरू केली. दरम्यान, तडजोडीअंती लाचेची रक्कम ५० हजार रुपये देण्याचे निश्चित झाले.

​लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात पंचांसमक्ष काटे यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आज सापळा लावून ५० हजार रुपयांची रोकड स्वीकारताना काटे यांना पथकाने रंगेहात ताब्यात घेतले. या कारवाईनंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 'एसीबी'च्या या कारवाईने लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून, प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गोडोलीतील दारूच्या दुकानाला परवानगी दिल्यास न्यायालयीन लढा - सामाजिक, माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरेंचा इशारा
पुढील बातमी
नवनियुक्त जिल्हा परिषद अध्यक्षांचे प्रमाणपत्र 'बोगस' - शशिकांत शिंदेंचा अधिवेशनात घणाघाती आरोप; जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ

संबंधित बातम्या