सातारा : कराड येथील कार्वे नाका येथे तीन युवकांना अटक करुन पोलिसांनी त्यांच्याकडून 2 पिस्टल व 3 जिवंत काडतुसे असा 1 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, संशयित युवक कराड व खटाव तालुक्यातील आहेत.
आकाश हिंदुराव चव्हाण (वय 27, रा. कार्वे नाका, कराड), तेजस भाऊ गुरव (वय 24, रा.हजारमाची ता. कराड), जय लहुराज कणसे (वय 20, रा.नवी पेठ, मायणी ता. खटाव) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.28 जानेवारी रोजी आक्या चव्हाण नावाचा युवक कार्वे नाका ते गोळश्वर जाणार्या रस्त्यावर बेकायदेशीर विनापरवाना पिस्तुले व त्यास लागणारी काडतुसे विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषन व कराड शहर पोलिसांना एकत्रितपणे समजली. त्यानुसार पोलिसांनी पथक तयार करुन सापळा लावला. पोलिसांचे पथक तेथे पोहचल्यानंतर संशयित तिघेजण तेथे होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 2 पिस्टल व 3 जिवंत काडतुसे सापडली. पोलिसांनी ती ताब्यात घेतली. बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत 1 लाख 60 हजार रुपये आहे. पोलिसांनी मुद्देमाल जप्त केल्यानंतर संशयित तिघा युवकांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली.
दरम्यान, सातारा जिल्हा पोलीस दलाकडून नोव्हेंबर 2022 पासून आतापर्यंत एकूण 111 देशी बनावटीची पिस्टल, 4 बारा बोअर बंदुका, 2 रायफल, 260 जिवंत काडतुसे, 384 रिकामी काडतुसे, 5 रिकामे मॅगझीन जप्त करण्यात आलेली आहेत.
या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, डीवायएसपी अमोल ठाकुर, पोनि अरुण देवकर, पोनि राजु ताशिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दत्तात्रय दराडे, रोहित फार्णे, अशोक भापकर, फौजदार विश्वास शिंगाडे, पारितोष दातीर, कृष्णा डिसले, पोलीस संतोष सपकाळ, विजय कांबळे, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, अविनाश चव्हाण, विशाल पवार, सचिन ससाणे, विजय मुळे, अनिल स्वामी यांनी सहभाग घेतला.