भोसे गावचे सुपुत्र हवालदार अभिजीत माने यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

by Team Satara Today | published on : 13 January 2026


कोरेगाव : भोसे, ता. कोरेगाव येथील सुपुत्र व भारतीय सैन्य दलाच्या एअर डिफेन्स मिसाईल रेजिमेंटमध्ये हवालदार पदावर कार्यरत असलेले अभिजीत संजय माने (वय ३२) यांचे मध्यप्रदेश राज्यातील बबिना येथे कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराने निधन झाले. मंगळवारी सायंकाळी भोसे येथे शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सोमवारी सकाळी नियमित कवायतीसाठी जात असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचे वीरमरण झाले. ही माहिती सैन्य दलाच्यावतीने कुटुंबीयांना देण्यात आली. ही दुःखद बातमी समजताच भोसे गावासह संपूर्ण कोरेगाव तालुक्यात शोककळा पसरली.

मंगळवारी सायंकाळी पाच वाजता त्यांचे पार्थिव कोरेगाव येथे दाखल झाले. डी. पी. भोसले महाविद्यालयातील एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली. त्यानंतर देशभक्तीपर गीतांच्या गजरात आणि मोटारसायकल रॅलीद्वारे पार्थिव भोसे गावात आणण्यात आले. भोसे गावात माने यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले. भोसे गावासह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली.

संपूर्ण गावातून सजवलेल्या ट्रकमधून अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्यसंस्काराच्या ठिकाणी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते साहिल शशिकांत शिंदे, पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ जगदाळे, कोरेगावचे माजी नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अरुण माने, तहसीलदार डॉ. संगमेश कोडे, पंचायत समितीच्या प्रशासक तथा गट विकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्यासह प्रशासकीय, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

सैन्य दल आणि पोलीस दलाच्यावतीने पार्थिवावरील राष्ट्रध्वज माने कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. त्यानंतर सातारा जिल्हा पोलीस दलाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली आणि शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

वीर जवान अभिजीत माने यांच्या पश्चात पत्नी, चार वर्षांचा मुलगा, वडील (माजी सैनिक), आई व बहीण असा परिवार आहे. २०१२ साली भारतीय सैन्यात भरती होऊन त्यांनी देशसेवेला सुरुवात केली होती. भोसे गावाने आपला एक धाडसी व कर्तव्यनिष्ठ सुपुत्र गमावला असून त्यांच्या त्यागाची आठवण कायम स्मरणात राहणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोळाचा ओढा, सातारा येथे शिकाऊ भरती मेळावा
पुढील बातमी
विनायक राजाराम भोसले (दादा) यांचा समाज भूषण पुरस्काराने सन्मान

संबंधित बातम्या