3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा

पोलीस अधीक्षक समीर शेख यांची माहिती

by Team Satara Today | published on : 19 November 2024


सातारा : विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे सातारा जिल्ह्यातील 3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा करण्यात आलेली आहेत. याशिवाय सर्व विधानसभा मतदारसंघात पेट्रोलिंग, एरिया डॉमिनेशन, नाईट मार्च याकरता तब्बल दीड हजाराहून अधिक पोलीस तैनात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

समीर शेख पुढे म्हणाले, दिनांक 20 नोव्हेंबर रोजी आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये तब्बल 109 उमेदवारांसाठी मतदान प्रक्रिया होत आहे. त्याकरता सातारा पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. गेल्या तीन आठवड्यामध्ये सातारा जिल्ह्यात सातारा पोलिसांनी 74 ठिकाणी रूट मार्च, तर 54 ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन केले आहे. याशिवाय 58 ठिकाणी एरिया डॉमिनेशन, तर 55 ठिकाणी ड्रिल झालेली आहे. सातारा जिल्ह्यात 3165 मतदान केंद्र निश्चित झालेली आहे. त्या मतदान केंद्राच्या ठिकाणी लोकसंख्येच्या तुलनेमध्ये पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. सर्व पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सुरक्षित वातावरणासाठी 155 पोलीस पेट्रोलिंग साठी नेमण्यात आलेले आहेत.

सातारा जिल्ह्यातील 48 गावांवर जिल्हा प्रशासनाचे विशेष लक्ष आहे. तेथे केंद्रीय निमलष्करी दलाचे मनुष्यबळ तैनात आहे. तसेच आरसीएफ व सीआरपीएफ कंपनीची तुकडी स्वतंत्रपणे तैनात आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग व नाकाबंदी करण्यात येत आहे. आचारसंहिता कालावधीमध्ये आत्तापर्यंत एक कोटी दहा लाख रुपये रोख रक्कम, एक कोटी दहा लाख रुपये किमतीची 26574 लिटर अवैध दारू, पाच किलो बहात्तर ग्रॅम अमली पदार्थ, त्याचबरोबर 69.39 किलो वजनाच्या 7.53 कोटी रुपये किमतीच्या मौल्यवान वस्तू व इतर वस्तू अडीच कोटी असा 13 कोटी रुपयांचा मुद्देमाल आत्तापर्यंत जप्त करण्यात आलेला आहे.

याशिवाय सातारा जिल्ह्यामध्ये परवाना प्राप्त पिस्तूलधारक 3348 आहेत. ही सर्व परवाना प्राप्त शस्त्र कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडे जमा करण्यात आलेली आहेत. निवडणूक कालावधी संपल्यानंतर संबंधितांना ती शस्त्रे परत दिली जाणार आहेत. दिनांक 12 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर यादरम्यान सातारा जिल्ह्यामध्ये जमावबंदी व शस्त्रबंदी लागू आहे. त्या दृष्टीने पोलिसांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. दिनांक 18 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर यादरम्यान सर्व मध्ये मद्य विक्री केंद्रे दिनांक 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत बंद राहतील. तसेच शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी मद्य विक्री केंद्र पुन्हा बंद ठेवण्यात येणार आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा

संबंधित बातम्या