सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवेळी झालेल्या राड्यानंतर आज विषय समित्यांच्या सभापती निवडीतही भाजपने आपला हुकमी 'बिनविरोध पॅटर्न' राबवून राष्ट्रवादी-शिवसेना गट युतीला पुन्हा एकदा धक्का दिला. विरोधकांचा आणखी एक सदस्य फोडून आणि त्यांची वाट अडवून भाजपने विषय समित्यांच्या सभापती निवडी बिनविरोध केल्या. त्यामुळे विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत निवड प्रक्रियेवर बहिष्कार टाकून सभात्याग केला.
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष - उपाध्यक्ष पदांच्या निवडीवेळी, दि. २० मार्च रोजी जिल्हा परिषदेत प्रचंड राडा झाला होता. ६५ सदस्यांच्या सभागृहात निवडणूकपूर्व युती केलेल्या राष्ट्रवादी - शिंदे गटाला मित्र पक्षांसह ३७ जागा जिंकूनही भाजपने २८ (एका अपक्षासह) जागा असूनही फोडाफोडीचे राजकारण करून जिल्हा परिषदेची सत्ता हस्तगत केली. त्यावेळी झालेल्या अभूतपूर्व झटापटीत पालकमंत्री शंभूराज देसाई जखमी झाले होते. या विषयाचे पडसाद थेट विधिमंडळातही उमटले होते.
या पार्श्वभूमीवर आज विषय समित्यांच्या सभापती निवडी होत असल्यामुळे जिल्हा परिषद व संपूर्ण परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. सभागृहात केवळ अधिकारी, नवनिर्वाचित सदस्य, तसेच पत्रकार यांनाच प्रवेशाची परवानगी होती. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक मजल्यावर पोलीस तैनात होते व कसून तपासणी केल्याशिवाय कोणालाही सोडले जात नव्हते. अशा तगड्या बंदोबस्तातच निवडणूक प्रक्रिया राबवली जात होती. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सकाळी १० ते १२ वेळ होती. परंतु सभागृहाचे सदस्य असूनही जागोजागी पोलिसांनी अडवणे, तपासणी करणे आणि त्यांच्याशी हुज्जत घालण्याची वेळ येणे यातच वेळ गेल्यामुळे विरोधी सदस्यांना अर्ज भरण्याची वेळ संपेपर्यंत सभागृहात पोहोचता आले नाही.
शेवटी अर्ज भरण्याची वेळ संपत आल्यामुळे संतप्त झालेल्या विरोधी सदस्यांनी सभागृहाच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा धिक्कार केला. त्यांनी यावेळी गद्दारांचाही उद्धार केला. आजही प्रशासनाने दादागिरी करून आम्हाला अर्ज भरण्यापासून वंचित ठेवले, प्रशासनाकडून हा अन्याय अत्याचार झालेला आहे असा गंभीर आरोप करत आम्ही याचा निषेध करत आहोत आणि निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकत आहोत असे ठणकावून सांगत विरोधकांनी सभात्याग केला. यावेळी राष्ट्रवादीचे अनिल देसाई, संदीप मांडवे, ॲड. उदयसिंह पाटील, बापूसाहेब शिंदे आदी सदस्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. सर्व विरोधकांनी यावेळी निषेधासाठी काळ्या फिती लावल्या होत्या.
यावेळी सभागृहात नूतन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, अजित साळुंखे माधवराव काळभोर, लालासाहेब जगदाळे, सागर शिवदास यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.
दोन फुटीरांना सभापतीपदाची लॉटरी
या सर्व गोंधळादरम्यान सत्ताधारी भाजपच्या वतीने महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदासाठी बावधन (ता. वाई) गटातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेल्या ऋतुजा विराज शिंदे, समाज कल्याण सभापती पदासाठी खेड बुद्रुक (ता. खंडाळा) गटातून निवडून आलेले ऋषिकेश अविनाश धायगुडे - पाटील, अन्य सभापतीपदांसाठी तेजस्विनी विक्रमशील कदम (पुसेसावळी गट, ता. खटाव), राष्ट्रवादीच्या लता अविनाश कर्णे (बुध गट, ता. खटाव) यांचे अर्ज दाखल झाले. प्रत्येक पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्यामुळे निवडी बिनविरोध झाल्या. या निवड प्रक्रियेपूर्वीच भाजपने राष्ट्रवादीच्या ऋतुजा शिंदे यांना फोडल्याचे स्पष्ट झाले. भाजप राष्ट्रवादीतून फोडलेल्या दोन सदस्यांना सभापती पदे दिल्यामुळे भाजपचे उमेदवार म्हणून निवडून आलेल्या सदस्यांमध्ये काहीशी नाराजी दिसून आली.
राष्ट्रवादी - शिंदे गटाची निदर्शने
सभागृहात सभापती निवडी बिनविरोध होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सभात्याग केलेल्या राष्ट्रवादी व शिंदे गटाच्या सर्व सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या पायऱ्यांवर बसून जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. त्यानंतर पोवई नाक्यावर जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याजवळही त्यांनी निदर्शने केली. या देशात - राज्यात लोकशाही ठेवायची आहे की नाही ? अशी सरबत्ती करत, अनिल देसाई यांनी यावेळी जिल्हा प्रशासनाचा, पोलीस यंत्रणेचा निषेध केला.
सहा फुटले; एकाची दांडी
अध्यक्ष - उपाध्यक्ष निवडीवेळी राष्ट्रवादीचे तीन आणि शिंदे गटाचे दोन सदस्य फुटल्याचे स्पष्ट झाले होते. आता सभापती निवडीदरम्यान अखेरच्या क्षणी राष्ट्रवादीच्या बावधन गटातील सदस्या ऋतुजा शिंदे यांना फोडण्यात भाजपला यश आले. त्यांना महिला व बालविकास समितीच्या सभापती पदाचे गाजर दाखवण्यात आले होते हे स्पष्ट झाले. त्यांच्यासह एकूण राष्ट्रवादीचे चार आणि शिंदे गटाचे दोन सदस्य फुटले आहेत, तर राष्ट्रवादीचेच कामेश कांबळे यांनी आजच्या निवड प्रक्रियेवेळी दांडी मारल्यामुळे त्यांची भूमिका संदिग्ध मानली जात आहे.