सातारा : जांभे, तालुका सातारा येथील सर्वे नंबर 30/1 ते 30/9 या क्षेत्रातील 118 हेक्टर जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण झाल्याचा तक्रार अर्ज महसूल मंत्र्यांकडे करण्यात आला होता. ही तक्रार भारतीय जनता पार्टीचे सोशल मीडिया सहसंयोजक दीपक पाटील यांनी केली होती आनंद सिताराम सप्रे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयांकडे या संदर्भात अर्ज दाखल केला होता या प्रकरणाची आठ जुलै रोजी सुनावणी होणार असून यामध्ये एकूण 16 जणांना नोटीस बजावण्यात आली आहे.
अतिरिक्त जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्या दालनामध्ये ही सुनावणी येत्या आठ जुलै रोजी होणार आहे. या प्रकरणांमध्ये भाजपचे सोशल मीडिया सहसंयोजक दीपक पाटील, जांभे ग्रामपंचायतचे सरपंच आनंद सप्रे, दीपक कदम, भरत सपकाळ, उत्तम सपकाळ, अरविंद कदम, अभयसिंह पाटणकर, रमेश कावेडिया, युवराज कावेडिया, सविता कावेडिया, रीशा कावेडिया, मयुराज प्रभाकर देशमुख, अनुराधा प्रभाकर देशमुख, अमृतराव दत्ताजी निंबाळकर, शशिकांत कृष्णाजी देशमुख, हिमांशू प्रतापराव दिघावकर (सर्व रा. जांभे, ता. सातारा) यांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत.
जांभे गावातील एकूण 118 हेक्टर मिळकतीची बेकायदेशीर कागदपत्रे तयार करून ती मिळकत इनाम वर्ग दोन असताना हस्तांतरित करण्यात आली आहे. या जमिनी बाबत झालेला फेरफार नंबर 160 नुसार सातबारावर येण्याकरता अर्ज करण्यात आला होता. यासंदर्भात महसूल मंत्र्यांकडे थेट तक्रार झाल्याने त्याबाबतच्या सुनावणीचे आदेश जिल्हा प्रशासनाला नुकतेच प्राप्त झाले. त्या दृष्टीने सुनावणीसाठी जिल्हा प्रशासनाने 16 जणांना नोटीस बजावून त्याची सुनावणी आठ जुलै रोजी करण्याचे निर्देशित केले आहे. जिल्हा प्रशासनाने सातारा तहसीलदारांना या आदेशाची अंमलबजावणी करून तसा अहवाल जिल्हा प्रशासनाला अवगत करावा, असे सूचित केले आहे.
तत्कालीन विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख त्यांच्या नातेवाईकांच्या नावाने या जमीन खरेदीचे प्रकरण 11 वर्षांपूर्वी चांगलेच गाजले होते. अद्यापही या प्रकरणाची धूळ खाली बसलेली नाही. वरिष्ठ प्रशासनाकडून या प्रकरणाची दखल घेण्यात आल्याने याबाबत सुनावणी होत आहे. या सुनावणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.