सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही देशातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बँक असून बँकेस देशपातळीवर व राज्यपातळीवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे. शेती क्षेत्रातील आधुनिक व नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर व त्याची सांगड बँकेच्या योजनेसोबत घालून बँक शेतक-यांच्या विकासात मोलाचे योगदान देत आहे. आंध्रप्रदेशचे पोलिस महासंचालक सन 1992 च्या बॅचचे आय. पी. एस. अधिकारी श्री. प्रताप रेड्डी हे शेती व शेतीपूरक व्यवसायामधील नवनवीन तंत्रज्ञान आधुनिक ज्ञान मिळविण्यास उत्सुक असं;असल्याने त्यांनी सातारा जिल्हयातील शेतक-यांच्या प्रगतीचे शेती, शेतीपूरक व फळबाग लागवडीचे मॉडेल पाहण्याकरिता व अधिक माहिती जाणून घेण्याकरिता बँकेच्या मुख्य कार्यालयास भेट दिली.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी श्री. प्रताप रेड्डी यांचे स्वागत केले. प्रशासकीय सेवेत काम करीत असताना विविध व्यासपीठावर त्यांना बँकेच्या नावलौकीकाबद्दल ऐकावयास मिळाले होते .
या प्रसंगी बँकेचे डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी गत सात दशकातील बँक राबवित असलेल्या शेतकरीभिमुख योजनांबद्दल व बँकेच्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल माहिती दिली. श्री. रेड्डी यांनी जिल्हयातील शेतक-यांकरिता बँक राबवित असलेल्या ए आय प्रणाली आधारित ऊस उत्पादन वाढ उपक्रमाचे कौतुक केले व यास अनुसरून तेलंगणा राज्यातील सुर्यपेठ जिल्हयातील सामुदायिक बायोचार प्लांटबद्दल माहिती दिली व या उपक्रमातून शेतक-यांना कार्बन क्रेडिटच्या माध्यमातून अर्थाजन प्राप्त होत असल्याचे सांगितले.
श्री. रेड्डी यांनी कृष्णा नदी ही आंध्रप्रदेशची जीवनदायीनी आहे व तिचा उगम श्रीक्षेत्र महाबळेश्वर येथे होत असलेने सातारा जिल्हयाचे विशेष आभार मानले व बँकेच्या भविष्यातील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. बँकेचे सरव्यवस्थापक श्री. राजेंद्र भिलारे यांनी उपस्थित मान्यवर अधिकारी व शेतकरी सभासद यांचे आभार मानले.
या भेटीप्रसंगी बँकेचे सरव्यवस्थापक श्री. राजीव गाढवे, सर्व विभागांचे उपव्यवस्थापक, अधिक्षक, प्रगतशील शेतकरी श्री. रामदास कदम आदी उपस्थित होते.