सातारा : उंब्रज येथील चोरे रोड मार्गावरील ‘श्री वाग्देवी ज्वेलर्स’चे मालक गणेश यादव-चोरेकर यांच्या दुचाकीवर असलेली सोने, चांदी व रोख रक्कमेने भरलेली बॅग सोमवारी सकाळी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. या बॅगेत सात तोळे सोने, पाच किलो चांदी आणि दोन लाखाची रोकड असा पंचवीस लाख रुपयांचा ऐवज होता.
दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उंब्रज पोलिसांनी तातडीने घटनास्थळी श्वान पथक आणि ठसेतज्ञ यांना पाचारण केले. घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली असून पोलिसांनी फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. उंब्रज येथे चोरे रोड मार्गावर चोरे येथील गणेश यादव यांचे वाग्देवी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांनी रोख रक्कम व सोने, चांदीने भरलेली बॅग गाडीवर ठेवून दुकानाचे कुलूप उघडण्यासाठी गेले. त्यावेळी अज्ञात चोरट्याने दुचाकीवर असलेली बॅग घेऊन क्षणार्धात पोबारा केला. ही घटना काही अंतरावर असलेल्या एका महिलेने पाहिल्यानंतर तीने आरडाओरडा केला. मात्र, कुणाला काही समजण्यापुर्वीच चोरटे दुचाकीवरून तेथून पसार झाले.
घटनेची माहिती उंब्रज पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक ठाणेकर घटनास्थळी दाखल झाले. सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज पवार तपास करीत आहेत.