सातारा : नायगाव, ता. खंडाळा येथील जमीनीचे मालक यांनी जमिनीच्या साठेखताद्वारे व जमीन विकून 70 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांवर शिरवळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चोरडीया इंडस्ट्रीयल पार्क एलएलपी या कंपनीद्वारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलका दत्तात्रय नेवसे, सारीका ऊर्फ देवराणी नितीन नेवसे (दोघी रा. नायगाव ता. खंडाळा), शुभांगी संतोष रगाडे (रा. वाठार कॉलनी ता. खंडाळा) व पंकज मोहन वीर (रा. सांगवी, ता. खंडाळा) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. पंकज वीर हा सातारा जिल्हािेधकारी कार्यालयात कंत्राटी कामगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी चोरडीया इंडस्ट्रीयलच्यावतीने समीर हेमंत कुलकर्णी (वय 53, सध्या रा.पुणे) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ते चोरडीया कंपनीमध्ये जनरल मॅनेजर आहेत. प्रदिप चोरडीया हे चोरडीया कंपनीचे मालक आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 12 जुलै 2012 साली प्रदीप चोरडीया यांनी पारुबाई नेवसे, अलका नेवसे, सारीका नेवसे व शुभांगी रगाडे यांच्याकडून गट क्रमांक 1044 मधील 85 आर हिस्सा साठेखत नोंदणी करुन कुलमुखत्यार प्रमाणे करारनामा करुन घेतला. तो व्यवहार त्यावेळी 42 लाख 50 हजार रुपयांचा ठरला होता. मात्र, शिधू नेवसे व त्यांच्या वारसांनी पारुबाई नेवसे यांच्या विरुध्द दावा दाखल केला. यामुळे न्यायालयाकडून जमीन हस्तांतरण मनाईचा आदेश झाला. तरीही चोरडीया यांच्यावतीने संबंधित शेतकर्यांना चेकद्वारे तसेच न्यायालयीन कामकाजासह इतर संबंधित बाबींवर 40 लाख रुपये अतिरीक्त खर्च केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
2025 मध्ये दिवाणी दावा मिटवण्यासाठी प्रदीप चोरडीया यांनी शिधू नेवसे व इतर शेतकरी यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर सहमतीने तहसीलदार खंडाळा यांच्याकडून वर्ग बदल करण्यासाठी व खरेदी खतासाठी सातबारा आदेेश खुले करण्याचे आदेश फेब्रुवारी 2025 मध्ये प्राप्त झाले. असे असतानाच अलका नेवसे, सारीका नेवसे, शुभांगी रगाडे यांनी प्रदीप चोरडीया यांची कोणतीही परवानगी न घेता. त्यांचे नोंदणीकृत साठेखत व कुलमुखत्यारपत्र कोर्टाकडून रद्द न करता. कोणतीही शासकीय परवानगी त्यांचे खरेदीखतास न जोडता पंकज वीर यांना जमीनीची विक्री केली. अशाप्रकारे पंकज वीर यांनी अलका नेवसे, सारीका नेवसे, शुभांगी रगाडे यांच्याबरोबर संगनमत करुन फसवणूक केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.