संविधान अमृत महोत्सव वर्षानिमित्त जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते झेंडा दाखवून संविधान दिंडी मार्गस्थ

by Team Satara Today | published on : 26 November 2025


सातारा :भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय राज्यघटनेबाबत जागरुकता, घटनात्मक अधिकार व कर्तव्याबद्दल सर्व नागरिकामध्ये जागरुकता व्हावी यासाठी “घर घर संविधान” हा उपक्रमाचे औचित्य साधून सामाजिक न्याय विभागामार्फत आज दि. 26 नोव्हेंबर रोजी सातारा शहरात संविधान दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी झेंडा दाखवून संविधान दिंडी मार्गस्थ केली.  

कार्यक्रमास जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, साताराचे उपायुक्त उमेश घुले, समाज कल्याण, सहायक आयुक्त सुनिल जाधव, जिल्हा समाज कल्याण अधिकारी विद्यानंद चल्लावार, पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, साताराचे विशेष अधिकारी श्रुती रकटे, इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी रोहित वाघ आदी उपस्थित होते.

याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, यांनी संविधान मसूदा निर्मितीचे अध्यक्ष‍, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल, राजवाडा, सातारा येथे झालेले असल्याने ही वास्तू अत्यंत पवित्र आहे. त्यामुळे आज संविधान दिंडीनिमित्त या वास्तूमध्ये उपस्थ‍ित असलेले आपण सर्वजण भाग्यवान आहोत. भारतीय संविधानाचे सार हे संविधानाच्या उद्देशिकेतच सामावलेले आहे. 

संविधान दिंडीच्या प्रारंभी छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल, राजवाडा, सातारा या ठिकाणी थोर राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करुन संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. त्यानंतर कन्याशाळा, सातारा व यशवंतराव चव्हाण समाजकार्य महाविद्यालय, जकातवाडी यांच्यावतीने पथनाट्य सादर करण्यात आले. जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी झेंडा दाखवून संविधान दिंडी मार्गस्थ केली. लेझीम व ढोल ताशा यांच्या गजरात दिंडी राजपथ मार्गे नगरपालिका चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळयाजवळ येवून थांबली. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील सातारा यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 

कार्यक्रमास सामाजिक‍ न्याय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागातील सर्व कर्मचारी, शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थी तसेच छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल, राजवाडा, सातारा, कन्याशाळा, सातारा, शाहू बोर्डींग सातारा मधील शिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थ‍ित होते. 

त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, सातारा या ठिकाणी भारतीय संविधानाबाबत जागरुकता या विषयावर प्रा. डॉ. सुभाष वाघमारे, छत्रपती शिवाजी महाविद्यालय, सातारा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य, समाज कल्याण विभागाचे अधिकारी-कर्मचाऱ्यांसह बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थ‍ित होते. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बरड गावच्या हद्दीत काळजाचा थरकाप उडवणारा अपघात
पुढील बातमी
खटाव तालुका माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी बलराम घोरपडे

संबंधित बातम्या