चितळीत जुन्या भांडणातून माजी सैनिकाचा खून; चार आरोपींना शिताफीने अटक, एक आरोपी फरार

by Team Satara Today | published on : 19 February 2026


सातारा : जुन्या भांडणाचा राग मनात धरून चितळी, ता. खटाव येथील माजी सैनिक रणजित मदत निकम यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार करून ठार मारल्याची गंभीर घटना घडली असून यापैकी चार आरोपींना पोलिसांनी शिताफीने अटक केली असून एक आरोपी फरार आहे.

या संदर्भात मायणी पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती पुढीलप्रमाणे, चितळी रहिवाशी रणजीत निकम हे चार वर्षांपूर्वी सैन्य दलातून सेवानिवृत्त झाले होते. सेवानिवृत्ती नंतर चितळी गावी शेती करीत होते. गेल्या चार महिन्यापूर्वी त्यांचे व गावातील पृथ्वीराज संभाजी पवार यांच्यात भांडण झाले होते. त्या संबंधाने त्यावेळी एकमेका विरोधात दोघांनी पोलीस ठाण्यामध्ये केस दाखल केली होती. त्यावेळी सर्वांवर कारवाई झाली होती. तेव्हापासून पृथ्वीराज पवार हा रणजीत निकम यांच्यावर चिडून होता.

बुधवार दि. १८ रोजी सायंकाळी सात वाजता भाऊ अभिजीत मदन निकम (वय ३६, रा. चितळी) हा ग्रामपंचायत कार्यालयाचे जवळ बाजारपेठेत असताना रणजीत कदम हे गावाच्या तालमीकडे बॉक्सर कंपनीच्या मोटरसायकल वरून चालले होते. थोड्याच वेळात तेथून जवळच असलेल्या तालमीकडे आरडाओरडा झालेला आवाज आल्याने भाऊ अभिजीत निकम हे तालमीकडे गेले. त्यावेळी रणजीत निकम यास पृथ्वीराज संभाजी पवार व पवन संतोष पवार हे तलवारीने, भरत शशिकांत पवार हे कुऱ्हाडीने मारहाण करीत असल्याचे दिसले. 

त्यावेळी पृथ्वीराज पवार हा रणजीत यास तुला आता जिवंत ठेवत नाही, तू मला का मारले होते, तुला आता आम्ही संपवतो असे म्हणून त्यांनी रणजीत निकम यांच्या डोक्यात हाता-पायावर, पाठीवर व पोटावर तलवारीने कुऱ्हाडीने वार केले. रणजीत निकम गंभीर जखमी होऊन जमिनीवर पडले. त्यावेळी त्यांचे डोक्यातून हाता-पायातून रक्त येऊन कपडे रक्ताने भिजले होते. 

त्यावेळी तेथे गावातील बरेच लोक जमले होते. मारामारी सोडवण्यासाठी त्यांचे जवळ येत असताना संतोष महादेव पवार व विश्वजीत उर्फ यश संतोष पवार हे त्याच्या हातातील कोयता घेऊन त्यांना धमकावून हाताने ढकलून जवळ येऊ नका असे ओरडत होते. यावेळी अभिजीत निकम व गावातील शिवाजी शहाजी सरगर, संदीप उत्तम पवार व इतर लोक जमा होऊन मारामारी सोडण्यास पुढे आले असता ते सर्वजण तेथून पळून गेले.

मारहाणीचा प्रकार महादेव मंदिर तालीम व मारुती मंदिरच्या कमानीवरील लाईटच्या उजेडात चालू असल्याचे अनेकांनी पाहिले आहे. त्यानंतर रणजीत निकम याना पुढील उपचारांसाठी मायणी येथील लाईफ लाईन मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये नेले असता तेथील डॉक्टरांनी तपासून ते मृत झाले असल्याचे सांगितले. नंतर सातारा जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकच्या ताब्यात देण्यात आला.

रणजीत निकम यांचे बंधू अभिजीत मदन निकम यांनी याबाबत मायणी पोलीस दूर क्षेत्रामध्ये तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात यातील पृथ्वीराज संभाजी पवार, पवन संतोष पवार, विश्वजीत उर्फ यश संतोष पवार (अल्पवयीन विधी संघर्ष ग्रस्त बालक) व संतोष महादेव पवार यांना पोलिसांनी तातडीने अटक केली आहे. भरत पवार फरार असून त्यास अटक करणे बाकी राहिले आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत अधिक माहिती घेतली. अधिक तपास मायणी पोलीस दूर क्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विक्रांत पाटील करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मशाल महोत्सवात किल्‍ले अजिंक्‍यतार्‍यावर तिघे जण होरपळले; रुग्णालयात उपचार सुरु
पुढील बातमी
शाहूनगरीत छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा; महाकालचा जयघोष, बहारदार डमरू वादनाने शिवजयंतीमध्ये रंगत; मुख्य मिरवणूक कार्यक्रमाचे उद्घाटन ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते

संबंधित बातम्या