पाचगणी : वाई, खंडाळा, महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्या नेतृत्वाखाली जनसंवाद यात्रेला गेल्या तीन दिवसापासून सुरुवात झाली असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मतदार संघात केलेल्या विविध विकास कामे मतदारापर्यंत पोहोचवण्यासाठी ही जनसंवाद यात्रा गावोगावी पोहोचत आहे. महाबळेश्वर पूर्व भागातील भिलार जिल्हा परिषद गटातील भिलार, दानवली, उंबरीसह 23 गावांमध्ये ही जनसंवाद यात्रा पोहचली.
यावेळी पुरुषोत्तम जाधव बोलताना म्हणाले, वाई -खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदारांच्या विरोधात मोठा आक्रोश असून अनेक वर्षे एकाच घरात सत्ता असूनही असून देखील देखील मतदार संघाच्या शाश्वत विकासासाठी कोणताही उपयोग झाला नाही. एकाच घरात सत्ता एकवटून कार्यकर्त्यांना मात्र कामापुरते वापरून घेण्याची प्रवृत्ती वेळीच रोखायला हवी. यासाठी आता सर्वांनी एकत्र येऊन या झुंडशाही विरोधात लढा दिला पाहिजे. माझ्यासारखा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कार्यकर्ता गेली अनेक वर्षे संघर्ष करीत आहे. मात्र आता परिवर्तनाची वेळ आली आहे.
यावेळी शिवसेना महाबळेश्वर तालुकाप्रमुख संभाजी भिलारे, पाचगणी शहर प्रमुख राहुल शिंदे, शिवसेना महाबळेश्वर तालुकाप्रमुख संजय शेलार, धोंडीबा धनावडे, लाडकी बहीण योजना महाबळेश्वर निमंत्रित सदस्य चंदर सपकाळ गुरुजी, सातारा जिल्हा परिषद सदस्या प्रणिता जंगम, शिवसेना महाबळेश्वर शहर प्रमुख विजय नायडू, सरपंच समीर चव्हाण, आनंद उत्तेकर, शिवसेना विभाग प्रमुख बाळू माने, मधुसागर चे संचालक राजेश सपकाळ, बबन उत्तेकर, सयाजी शेलार, राजाराम शेलार, अविनाश शेलार, नारायण जंगम, प्रदीप शिंदे, सरपंच अविनाश ढेबे, सरपंच दीपक जाधव, बाबुराव शेलार, नारायण शेलार, उद्योजक शंकर स्वामी यांच्यासह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.