सातारा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने करंजे (ता. जावळी) येथे कारवाई करून, दोन लाख 54 हजार रुपयांची गोवा बनावटीची विदेशी दारु जप्त केली. याप्रकरणी गणेश विष्णुदास धनावडे (वय 28, रा. करंजे, ता. जावळी) आणि अवैधरित्या मद्य पुरवठा करणारा अतुल ज्ञानदेव धनावडे (वय 29, मूळ रा. गवडी, ता. जावळी, सध्या रा. बिरवडी, ता. महाड, जि. रायगड) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी, गोवा बनावटीच्या विदेशी दारुची जावळी तालुक्यातून अवैध वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या सातारा येथील भरारी पथकाला मिळाली. या पथकाने करंजे, ता. जावळी येथे सापळा रचून, गणेश धनावडे याच्या ताब्यातून विदेशी मद्य आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले दुचाकी वाहन जप्त केले. त्याला मद्य पुरवठा करणार्या अतुल धनावडे याच्याकडून दुचाकी वाहन जप्त केले. निरीक्षक माधव चव्हाण, दुय्यम निरीक्षक अजयकुमार पाटील, विजय मरोड, जवान मनीष माने, सागर आवळे, अजित रसाळ यांनी ही कारवाई केली.