नाशिक : छगन भुजबळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अण्णासाहेब पाटील महामंडळाची वेबसाईट बंद पाडली. गेले महिनाभर संकेतस्थळ बंद असल्याने मराठा समाजाच्या युवकांची कोंडी झाली. हजारो युवक ऐन दिवाळीत नोकरी, व्यवसायासाठीच्या कर्जापासून वंचित राहिले, असे गंभीर आरोप अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले.
नरेंद्र पाटील नाशिक दौऱ्यावर होते. त्यांनी मराठा समाजाच्या बेरोजगार युवकांशी त्यांनी चर्चा केली. त्यांच्या रोजगार आणि व्यवसायाबाबतच्या समस्या समजून घेतल्या.ते माझ्यावर सतत चिडचिड करतात. महिनाभर पोर्टल बंद राहिल्याने पंधरा हजार मराठा समाजाच्या युवकांचे नुकसान झाले, असा दावा त्यांनी केला.
अण्णासाहेब पाटील महामंडळाचे पोर्टल बंद आहे. त्यामुळे युवकांना नोंदणी, कागद पत्रांची पूर्तता आणि आपले प्रकल्प अहवाल अपलोड करता येत नाहीत. महामंडळाला कर्ज घेतलेल्या युवकांच्या व्याजाचे अनुदान देता येत नाही.एकट्या नाशिक जिल्ह्यात दहा ते बारा हजार मराठा समाजाच्या युवकांची त्यामुळे कोंडी झाली आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अध्यक्षांनीच उपमुख्यमंत्री पवार यांच्यावर हा आरोप केला आहे. मराठा समाजाची कोंडी केल्याच्या या आरोपाने अजित पवार यांच्या विषयी रोष वाढू शकतो. आधीच पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्याने पवार अडचणीत आहेत. अशातच हा संवेदनशील आरोप झाल्याने नरेंद्र पाटील यांच्या या टाइमिंग विषयी देखील चर्चा होत आहे.
त्यांच्या या आरोपांमुळे आता एकच खळबळ उडाली असून नरेंद्र पाटील यांनी अजित पवार यांना थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत आरोपांचा बॉम्ब टाकला आहे. यासंदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संदेश पाठविला आहे. अण्णासाहेब महामंडळाच्या कामकाजात अडथळा आणण्याचा प्रयत्न होत आहे. या संदर्भात महामंडळाचे अध्यक्ष पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन मंत्र्यांविरुद्ध गंभीर आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे. एवढ्यावरच न थांबता नरेंद्र पाटील म्हणाले, मी कोणतेही प्रश्न घेऊन अजित पवारांकडे गेलो की त्यांना वाटते मला निधी हवा आहे.