सातारा : उरमोडी जलाशयात बाधित झालेल्या वेणेखोल गावास प्रशासनाने २५ वर्षांपासून वंचित ठेवले आहे. म्हसवड ता. माण येथे ५८ खातेदारांचे आदेश प्राप्त होऊनही सातबारा व कब्जेपट्टी करण्यात आली नाही. त्यामुळे दि. १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी उरमोडी जलाशयाच्या भिंतीवर सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा वेणेखोल ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिली आहे.
वेणेखोल ग्रामस्थांचे म्हसवड (मसाईवाडी, वीरकरवाडी) येथे पुनर्वसन करण्यात आले असून पात्र ६८ खातेदारांपैकी ५८ खातेदारांचे आदेश मंडलाधिकारी व तलाठी यांना आदेश दिले. मात्र, तेथील राजकीय दबावामुळे ५८ खातेदारांचे सातबारा व कब्जेपट्टी करत नाहीत. दलालाच्या माध्यमातून जमीन बळकवण्याचा प्रयत्न सुरु आहे. उपविभागीय अधिकारी सातारा यांचे पुनर्वसन जमीन वाटपाचा कार्यभार राजकीय दबावापोटी काढून घेण्यात आला आहे. तरी त्यांच्याकडे पुन्हा कार्यभार सोपवून पात्र खातेदारांना तात्काळ जमीन वाटपाचे आदेश देण्यात यावेत. गेली २५ वर्षे आम्ही ग्रामस्थ पुनर्वसनासाठी लढा देत आहोत. त्यामुळे दि. १४ ऑगस्टपूर्वी सातबारा व कब्जेपट्टी करण्यात यावी. अन्यथा आम्ही ग्रामस्थ दि. १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी उरमोडी जलाशयाच्या भिंतीवर सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
स्वातंत्र्यदिनी वेणेखोल ग्रामस्थांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा
by Team Satara Today | published on : 11 August 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा