सातारा : सातारा जिल्हा न्यायालयासमोर सोमवारी पहाटे झालेल्या अपघाताने परिसर दणाणला. तब्बल १०८ रुग्णवाहिका आणि एसटी बस यांची समोरासमोर जोरदार धडक होऊन दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाली नाही.
याबाबत घटनास्थळ व पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साताऱ्याहून मुंबईकडे जाणारी सातारा–मुंबई सेंट्रल एसटी बस न्यायालयासमोरील रस्त्याने बॉम्बे रेस्टॉरंटकडे जात होती. त्याच वेळी पोवई नाक्याकडून येणारी १०८ रुग्णवाहिका त्याच मार्गावर वेगाने येत होती. पुलाच्या कामामुळे तात्पुरती एकेरी वाहतूक सुरू असल्याने दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली.
हा अपघात इतका जबरदस्त होता की, रस्त्यावर वाहनांचे तुकडे विखुरले. या घटनेची माहिती मिळताच सातारा शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली आणि अपघातग्रस्त वाहनांना रस्त्याच्या कडेला हटवले.
जिल्हा न्यायालयाजवळील ओढ्याच्या पुलाचे काम सुरू असल्याने वाहतूक आधीच कोंडीत अडकलेली असते. एकेरी मार्गावर दोन्हीकडून येणाऱ्या वाहनांचा वेग वाढल्याने अशा अपघातांची शक्यता कायम असते. विशेषतः रुग्ण नसतानाही काही रुग्णवाहिका सायरन वाजवत वेगाने धावत असल्याचे नागरिकांचे तसेच पोलीसांचेही निरीक्षण आहे. त्यामुळे अशा चालकांना वेग मर्यादा आणि नियमांचे पालन करण्याविषयी जिल्हा शल्य चिकित्सकांनी कठोर समज देणे अत्यावश्यक असल्याची भावना सातारकरमधून व्यक्त होत आहे.