कराड : येथील कृष्णा नदीच्या पुलावरून बुधवारी दुपारी युवतीने नदीपात्रात उडी घेतली. त्याचवेळी माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील तेथून जात असताना त्यांच्यासोबत कर्तव्यावर असणार्या पोलीस कर्मचार्याने नदीपात्रात उडी घेत संबंधित युवतीला वाचवले.
येथील नविन कृष्णा पुलावर बुधवारी दुपारी रहदारी सुरू असताना एक युवती पुलावर आली. तीने कुणाला काही समजण्यापुर्वीच पुलाच्या कठड्यावरून नदीपात्रात उडी घेतली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे रस्त्यावरून प्रवास करणार्या प्रवाशांसह नागरीकांनीही त्याठिकाणी धाव घेतली. दरम्यान, माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील हे त्यांच्या वाहनातून पुलावरून जात असताना गर्दी जमल्याचे त्यांना दिसले. त्यांनी त्यांची वाहने थांबवली.
यावेळी माजी सहकारमंत्री पाटील यांच्यासोबत कर्तव्यावर असणारे पोलीस कर्मचारी संताजी माने यांनी तातडीने नदीपात्रात उडी घेत संबंधित युवतीला वाचवले. त्यांनी धाडसाने त्या युवतीला नदीपात्राबाहेर काढले. त्यानंतर उपचारासाठी तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. संबंधित युवतीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकार्यांकडून देण्यात आली.