सातारा : लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमच्या कलेक्शन केअर ॲंड एक्सेस विभागाच्या संचालिका कॅथरीन पारसन्स यांनी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला भेट दिली. येथील ऐतिहासिक वस्तू व त्यांच्या संवर्धनाचे काम पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी कॅथरीन पारसन्स यांचे स्वागत केले. या भेटीदरम्यान, पारसन्स यांनी संग्रहालयाच्या विविध दालनांना भेटी देतानाच त्यांची तपशीलवार माहिती जाणून घेतली. अभिरक्षक शिंदे यांनी त्यांना ही दालन, महत्त्वाच्या व ऐतिहासिक कलाकृती तसेच दुर्मीळ वस्तूंच्या संग्रहाची माहिती दिली.
संग्रहालय व्यवस्थापनाने ऐतिहासिक ठेव्याच्या जतनासाठी केलेले प्रयत्न पाहून पारसन्स प्रभावित झाल्या. या कामाची त्यांनी प्रशंसा केली. संग्रहालयाच्या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण ठरली असून, यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कलेच्या आणि ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी सुरू असलेल्या कार्याची देवाणघेवाण होणार आहे. यावेळी संग्रहालयातील कर्मचारी उपस्थित होते.
शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष असणारी लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमधील वाघनखे दि. १९ जुलै २०२४ रोजी साताऱ्यात दाखल झाली. सात महिन्यांनंतर ही वाघनखे नागपूरला व त्यानंतर दि. ३० सप्टेंबर रोजी ती कोल्हापूर येथील लक्ष्मीनिवास संग्रहालयात विसावली. ही वाघनखे सुखरूप, कोल्हापूरपर्यंत पोहचविण्यासाठी कॅथरीन पारसन्स आल्या होत्या. या नियोजित दौऱ्यावेळी त्यांनी संग्रहालयाला भेट दिली