सातारा : सातारा कारागृहात मी दुसऱ्या कारागृहामध्ये जाणार नाही असे म्हणत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणात जिल्हा न्यायालयाने तरडफ येथील आरोपीला एक वर्षाचा सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. ११ फेब्रुवारी २०१९ मध्ये सातारा कारागृहात हा प्रकार घडला होता. आरोपी अभिजित उर्फ आबा रामदास गोडसे (वय ३१, रा. तरडफ, ता. फलटण) याला कोल्हापूरच्या मध्यवर्ती कारागृहात नेण्यात येणार होते. यासाठी सातारा कारागृहातील मुख्य गेटच्या आतील बाजुस त्याला आणले होते. त्यावेळी त्याने कोल्हापूरला नेऊ नये म्हणून सातारा कारागृहातील मागील बाजूस असलेल्या लोखंडी दरवाजाच्या बारला धरुन आत्महत्या करण्याच्या उद्देशाने जोरजोरात धडका दिल्या. मी जीवाचे बरे-वाईट करतो, तुम्हा सगळ्यांना अडकवतो. काही झाले तरी मी दुसऱ्या कारागृहात जाणार नाही, असे म्हणतही कारागृहातील पोलिस जयवंत जाधव यांना शिवीगाळ केली. तसेच शासकीय कामात अडथळा आणला. त्यामुळे याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.
सातारा शहर पोलिसांनी तपास करुन दोषारोपपत्र सादर केले होते. या खटल्याचा निकाल जिल्हा न्यायालयात लागला. प्रथम अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. बी. भिल्लारे यांनी आरोपी अभिजित गोडसे याला एक वर्ष सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड, दंड न दिल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील महेश कुलकर्णी यांनी काम पाहिले. या खटल्यासाठी पोलिस उपअधीक्षक राजीव नवले, पोलिस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांनी विशेष परिश्रम घेतले.
प्रॉसिक्यूशन स्कॉडचे पोलिस उपनिरीक्षक सुनील सावंत, सहायक पोलिस फौजदार शशिकांत गोळे, अरविंद बांदल, हवालदार गजानन फरांदे, रहिनाबी शेख, अमित भरते आदींनी मदत केली.
शासकीय कामात अडथळा प्रकरणी एकास सश्रम कारावास
दुसऱ्या कारागृहात जाणार नसल्याचे कारण
by Team Satara Today | published on : 19 September 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा