दहिवडी : अस्मानी पावसाने संकट ओढवलेल्या शेतकऱ्यांना तसेच पूरग्रस्त बाधित झालेल्यांना एक आधार म्हणून श्रीमती फुलाबाई बापू नरळे सामाजिक व शैक्षणिक ट्रस्ट आणि साईसागर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. २३ रोजी सायंकाळी गोरज मुहूर्तावर वरकुटे, ता. माण येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
ज्यांची नजिकच्या काळात लग्ने ठरली असतील किंवा ठरायची असतील त्यांनी वरील सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी लवकरात लवकर नावे नोंदवावी आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या सामुदायिक विवाह सोहळ्यात वधूवरांना संपूर्ण पोषाख व ५१ भांड्याचा सेट आयोजकांकडून सप्रेम भेट दिले जाणार आहे. भव्यदिव्य सुंदर असा सजावट केलेला लग्नमंडप, हजारों लोकांच्या उपस्थितीत वधूवरांना शुभ आर्शिवाद व उपस्थितांना स्वादिष्ट भोजन देण्यात येणार आहे. या सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्ने होणे म्हणजे सन्मान व प्रतिष्ठेचे समजणे. कितीही करोडपती असला किंवा एखाद्या गरीब असला तरी मानसन्मान सारखाच होणार आहे.
श्रीमती फुलाबाई बापू नरळे सामाजिक व शैक्षणिक ट्रस्ट पिंपरी चिंचवड पुणेचे संस्थापक अध्यक्ष तानाजीराव बापू नरळे हे आयोजक असून अधिक माहितीसाठी सचिव शिवाजीराव गवंड ( ९८८१५७९७४५), कार्याध्यक्ष विक्रम बाड ( ९८२३५६५८६०), सहसचिव हरिभाऊ खंडेराव पाटसकर, पंढरपूर ( ९८८१११७६७५) वर संपर्क साधावा.