सातारा : विसाव्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा 2025 च्या पाच जिल्ह्यांच्या स्पर्धांमध्ये सातारा जिल्ह्याने वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये 17 सुवर्ण, तीन रौप्य व सहा कांस्य पदके प्राप्त करत सर्वसाधारण विजेतेपदाचा मान मिळवला. या संघाला सातारा जिल्ह्याच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेखा कोसमकर व कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या उपस्थितीत करंडक प्रदान करण्यात आला.
सातारा शहरामध्ये विसाव्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य 2025 मेळाव्याचे तीन दिवस आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये पोलीस अधिकारी, अंमलदार यांची व्यावसायिक कौशल्य चाचणी, तपास कौशल्य, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, घातपात विरोधी तपासणी, श्वान स्पर्धा, संगणक वापर अशा कौशल्य स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे ग्रामीण या पाच जिल्ह्यांचे 130 स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये सातारा जिल्ह्याने पाच स्पर्धांमधून घवघवीत यश संपादन करून 17 सुवर्ण, तीन रौप्य व सहा कांस्य पदके प्राप्त करून सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे, तर उपविजेतेपद पुणे ग्रामीण पोलीस संघाने पटकावले. कोल्हापूर परिक्षेत्रीय कर्तव्य मेळाव्यामध्ये प्रथमच सुरू करण्यात आलेला फिरता सूर्या चषक सातारा जिल्ह्याच्या नार्कोटिक्स शोधक विभागाच्या सूचक श्वानाला मिळाला आहे.
या कार्यक्रमासाठी कोल्हापूर पोलीस अधीक्षक योगेश कुमार, सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल, सातार्याच्या अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, सातारा गृह उपाधीक्षक अतुल सबनीस, पद्मा कदम, वाचक पोलीस उपाधीक्षक कोल्हापूर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सर्व मान्यवरांचे विशेष स्वागत करण्यात आले. विजेत्या संघाला सुनील फुलारी महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांच्या हस्ते करंडक प्रदान करण्यात आला. त्यावेळी सातारा जिल्हा पोलिसांच्या संघाने एकच जल्लोष व्यक्त केला. दिनांक 6 ते 8 ऑगस्ट या दरम्यान या स्पर्धा पोलीस मुख्यालय सातारा, शिवतेज हॉल सातारा, पोलीस परेड ग्राउंड सातारा व वाय सी कॉलेज सातारा या ठिकाणी घेण्यात आल्या होत्या.
सातारा जिल्हा पोलिसांना सर्वसाधारण विजेतेपदाचा मान
सूर्या फिरता चषक सातारच्या सूचक श्वानास
by Team Satara Today | published on : 08 August 2025

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा