सातारा : हनुमान मंदिर सदरबजार येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षपूर्ती निमित्त हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.या संमेलनामध्ये हिंदू समाजाचा जागतिक परंपरेचा वारसा तसेच समाजाची सांस्कृतिक व सामाजिक मूल्ये या संदर्भाने सामाजिक एकोपा राखण्याची गरज आहे. राष्ट्रीयत्व हा एकजिनसी समाजाचा खरा गाभा आहे असे प्रतिपादन माजी उपनगराध्यक्ष आणि पहिल्या हिंदू संमेलनाचे अध्यक्ष शंकर माळवदे यांनी केले.
सातारा जिल्ह्याच्या आणि विशेषतः आपल्या 'सदरबझार'च्या इतिहासातील एक सुवर्णक्षण आहे. सध्या संपूर्ण देशभर हिंदू समाजामध्ये एक मोठी जागृती पाहायला मिळत आहे. या महान संस्कृतीचे रक्षण, परंपरांचे जतन आणि विखुरलेल्या हिंदू शक्तीला एका सूत्रात गुंफण्यासाठी ठिकठिकाणी 'हिंदू संमेलनांचे' आयोजन केले जात आहे. सातारा शहरात एकूण १७ संमेलनांची एक मोठी मालिका आयोजित करण्यात आली असून, त्याचे पहिले आणि मानाचे हिंदू संमेलन दिनांक एक आणि दोन एप्रिल रोजी सदर बझार येथील श्री हनुमान मंदिर परिसरात संपन्न झाले
शंकर माळवदे पुढे म्हणाले, या संमेलनामागचे प्रमुख उद्दिष्ट आणि विषय हे ऐक्य आणि संघटन करून जाती-पातींच्या पलीकडे जाऊन केवळ 'हिंदू' म्हणून एकत्र येणे. सांस्कृतिक वारसा जपूनआपल्या पूर्वजांनी दिलेल्या गौरवशाली परंपरा आणि मूल्यांची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे. सामाजिक जागृती करताना राष्ट्रहित आणि समाजासमोरील सद्य आव्हानांवर विचारमंथन करणे. धर्माभिमान ठेवून आपल्या सण-उत्सवांचे महत्त्व सांगून धर्माप्रती आदर वृद्धिंगत करणे आणि या निमित्ताने सर्व हिंदूंना एकत्रित करणे हे आहे.
एक एप्रिल रोजी सदरबझार पेठेतून काढण्यात आलेली शोभायात्रा खूपच उत्कृष्ट होती , श्री महिषासुर मर्दिनी, श्री हनुमान यांच्या वेशभूषेतील कलाकारांनी चांगले काम केले, वासोळे येथील भजनी मंडळ, कीर्तन मंडळ यांनी चांगले सादरीकरण केले , ऐतिहासिक शस्त्रविद्या प्रदर्शन सुद्धा चांगले होते, स्थानिक पुरुष ,युवक, बाल मातृशक्ती यांचा सहभाग सुद्धा मोठ्या प्रमाणावर होता. फटाक्यांच्या आतशबाजीत निघालेली शोभायात्रा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. लहान मुलांनी विविध वेशभाषेत येऊन ऐतिहासिक महापुरुष आणि रणरागिणीची आठवण करून दिली.
दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन एप्रिल रोजी झालेल्या कार्यक्रमातील शाहीर शुभम भुतकर यांचा पोवाडा अंगावर रोमांच उभा करत होता. सौ. भक्ती डाफळे यांचे मार्गदर्शन हिंदू महिला मुलींसाठी वर्गासाठी अत्यंत उपयुक्त होते. परमपूज्य महंत श्री परशुरामजी महाराज वाघ, मठाधिपती कार्तिक स्वामी मंदिर, देवदरी , अभेरी, तालुका खटाव याचे संतांचे आशीर्वचन हिंदू समाजाच्या एकत्रीकरणाची गरज सांगणारे होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे, महामार्ग आयामाचे प्रांत कार्यकारणी सदस्य युवराज कुलकर्णी यांचे संघाची स्थापना, उद्देश आणि कार्य या बाबतीतले मार्गदर्शन हिंदू समाजाने एकत्र कशासाठी आले पाहिजे, त्यामुळे काय काय साध्य होईल यासाठी महत्वपूर्ण होते. नारायणी समूहाच्या माता भगिनींनी राम तांडव सादर करून कार्यक्रमाला एक चांगले उठावदार स्वरूप आणले होते.
सर्वांनी या कार्यक्रमात पुरते मर्यादित न राहता हिंदू समाजाच्या एकत्रीकरणासाठी, संरक्षणासाठी आणि हिंदू संस्कृतीच्या संवर्धनासाठी काम करत राहूया, अशी अपेक्षा सदरबझार हिंदू संमेलन समितीचे उपाध्यक्ष डॉ. शंकर गोसावी यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाच्या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समरसता मंचाचे प्रांत संयोजक मुकुंद आफळे, जिल्हा कार्यवाह महेश शिवदे, जिल्हा सहकार्यवाह संदीप आठल्ये, सातारा शहर कार्यवाह रवी गायकवाड, सदर बझार हिंदू संमेलन समिती कोषाध्यक्ष चंद्रशेखर पानसकर यांची प्रमुख उपस्थिती होती.