सातारा : कोरेगाव येथील एका अल्पवयीन मुलीने एका मुलाच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरी आत्महत्या केली. यातील संबंधिताला सात दिवसांत अटक करण्यात यावी. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा रक्षक प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांनी पोलीस अधीक्षक तुषार दोेशी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कोरेगावमधील एक अल्पवयीन मुलगी शाळेत जात-येत असताना तेथील एका मुलाने दिलेल्या रोजच्या मानसिक त्रासाला कंटाळून मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबाबतची तक्रार संबंधित मुलीच्या कुटुंबीयांनी कोरेगाव पोलीस स्टेशनला 27 जानेवारी रोजी दाखल केली. तरीही आजपर्यंत संशयिताला अटक करण्यात आली नाही. तसेच संबंधिताचे आई-वडील पीडित कुटुंबीयांना घरी येऊन तसेच शेतामध्ये जाता-येता केस मागे घेण्यासाठी धमकावत आहेत. याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा.
संशयितास येत्या सात दिवसात अटक न केल्यास कोरेगाव पोलीस स्टेशन समोर पीडित कुटुंबाला सोबत घेऊन रक्षक प्रतिष्ठान तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल, याची नोंद घ्यावी. यामध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास याची संपूर्ण जबाबदारी पोलिसांची राहील, असेही माळी यांनी निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देताना सातारा पालिकेचे नगरसेवक गुरुदेव कांबळे, जिल्हा संघटक सुशील जाधव, तन्वीर शेख, तौसिफ शेख, आरिफ शेख, आकाश सणस, अविष्कार जाधव, अजिंक्य देवकर व पीडित कुटुंब उपस्थित होते.