सातारा : सातारा शहर परिसरातील हॉटेल प्रीती एक्झिक्युटिव्ह सध्या राजकीय घडामोडींचे प्रमुख केंद्रबिंदू ठरले आहे. राष्ट्रवादीचे गटनेते ठरल्यानंतर त्यांच्या नोंदणी प्रक्रियेनंतर सर्व सदस्य सुरक्षितरित्या परराज्यामध्ये रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे. भारतीय जनता पार्टीचे ऑपरेशन लोटस लक्षात घेता राष्ट्रवादी अजित पवार गटाने ही मोर्चे बांधणी केल्याची जोरदार चर्चा आहे.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीचा पेच कायम असून सर्व नजरा या मुंबईकडे लागून राहिले आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. तर शिवसेना गटाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार हा सुद्धा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. सातारा जिल्हा परिषदेत 27 जागा मिळवून भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा ठरला आहे. तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाला 20 आणि शिंदे शिवसेना गटाला 15 जागा मिळालेले आहेत. राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष जिल्हा परिषदेच्या समीकरणात एकत्र आहेत असा स्पष्ट निर्वाळा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे.
येत्या काही दिवसांमध्ये सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो त्या दृष्टीने राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी गट नोंदणी करून आपापले गटनेते निवडले आहेत. भारतीय जनता पार्टी बेरजेच्या राजकारणासाठी सदस्यांची बेरीज करण्याकरता ऑपरेशन लोटस राबवू शकते हा राजकीय धोका टाळण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील तसेच खासदार नितीन काका पाटील यांच्या संयुक्त चर्चेनंतर राष्ट्रवादीचे बरेचसे जिल्हा परिषद सदस्य पर जिल्ह्यामध्ये अज्ञात ठिकाणी रवाना झाल्याची चर्चा आहे.
भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित 27 सदस्यांचा येथील लेक व्हयू हॉटेलमध्ये सत्कार सोहळा पार पडला. यावेळी राजकीय समीकरणांचा सार्वजनिक बांधकाम मंत्री व सातारा जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आढावा घेतला. त्यावेळी देवेंद्रजी हे तो सब मुमकिन है असे म्हणत शिवेंद्रसिंहराजे यांनी भारतीय जनता पार्टीने सत्तेचा दावा कायम ठेवल्याचे संकेत दिले आहेत.
बेरजेच्या राजकारणासाठी भारतीय जनता पार्टी कडून कोणतीही गुप्त रणनीती आखली जाऊ शकते या दृष्टीने येथील फर्न हॉटेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सोमवारी दुपारी बैठक झाली. या बैठकीनंतर त्यांना एक गोपनीय अजेंडा देण्यात आल्याची चर्चा असून सर्व सदस्य हे टप्प्याटप्प्याने सातारा जिल्ह्याच्या बाहेर रवाना झाल्याचे समजून येत आहे. या माहितीला राजकीय रणनीतीचा भाग म्हणून राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी बोलण्यास नकार दिलेला आहे.