दहा लाखाची लाच मागणार्‍या मुख्याधिकार्‍यांसह चौघांवर गुन्हा

सातारा एसीबीची कराडात कारवाई; दोनजण ताब्यात

by Team Satara Today | published on : 25 March 2025


कराड : येथील विकासकास बांधकाम परवानगीसाठी दहा लाखाची लाच मागणार्‍या कराड पालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकार्‍यांसह चौघांवर सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाने गुन्हा दाखल केला असून, सहा. नगर रचनाकारासह दोनजणांना ताब्यात घेतले आहे. सातारा एसीबीच्या या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, यातील तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक असून, त्यांचे कराड शहरातील सि. सर्व्हे. क्र. 79 येथे पार्किंग आणि पाच मजली इमारतीचे काम प्रस्तावित आहे. तक्रारदार यांच्याकडून इमारत बांधकाम परवानगी मिळणे बाबत 2017 मध्ये कराड नगरपरिषद येथे प्रकरण देण्यात आले होते. त्या कामाची मुदतवाढ 2 जाने. 2019 पर्यंत घेण्यात आली होती. हे काम सुरू न झाल्याने पुन्हा 2021 मध्ये सुधारित परवानगी मिळाली. दरम्यानच्या काळामध्ये नियमावलीत बदल झाल्याने सुधारित बांधकाम परवानगी परवाना मिळणे बाबत पुन्हा 2023 मध्ये अर्ज दाखल केला होता. संबंधित परवानगीसाठी तक्रारदार यांनी सहा. नगर रचनाकार स्वानंद दिलीप शिरगुप्पे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. असे असताना शिरगुप्पे यांनी खाजगी इसम अजिंक्य देव यांच्या समवेत तक्रारदार यांना समक्ष भेटून बांधकामांमध्ये दोन हजार स्क्वेअर फुट वाढीव एफएसआय इतकी मिळकत असल्याने बाजारभावाप्रमाणे मिळकतीच्या 80 लाखांपैकी दहा ते बारा टक्के रक्कम म्हणजेच दहा लाख रुपयाच्या रकमेची मागणी पंचांसमक्ष केली होती.

या प्रकरणामध्ये कराड पालिकेचे बदली झालेले तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे, सहा. नगररचनाकार शिरगुप्पे, कराड पालिकेचा कर्मचारी तौफिक शेख व खाजगी इसम अजिंक्य देव यांनी संगनमताने संबंधित तक्रारदाराकडे लाचेच्या रकमेपैकी पहिला हप्ता म्हणून पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. विशेष म्हणजे यामधील संशयित आरोपी लोकसेवक शंकर खंदारे हे कराड नगर परिषदेत मुख्याधिकारी या पदावर कार्यरत होते. ते दिनांक 20 मार्च रोजी मुख्याधिकारी नगरपरिषद कराड या पदावरून कार्यमुक्त झाले आहेत. तरी देखील त्यांनी तक्रारदारांची सुधारित बांधकाम परवाना परवानगी खाजगी इसम अजिंक्य देव यांच्याकडून प्राप्त झालेल्या फाईलवरून स्वानंद शिरगुप्पे आणि तौफिक कय्युम शेख यांच्या मदतीने बांधकाम परवानासाठी आवश्यक असलेले चलन आलोसे शिरगुप्पे यांच्या व्हाट्सअप वरून स्वतःच्या मोबाईल क्रमांकावर घेऊन मागील तारखेच्या चलनावर सह्या करून पुन्हा आरोपी शिरगुप्पे यांच्या मोबाईल क्रमांकावर परत पाठवून लाच घेण्यास पोषक वातावरण तयार केले.

संबंधित तक्रारदाराने याबाबतची तक्रार सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानुसार सातारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक राजेश वसंत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन राऊत, श्रीधर भोसले, पोलीस हवा. नितीन गोगावले, गणेश ताटे, निलेश राजपुरे, प्रशांत नलावडे, विक्रमसिंह कणसे यांनी काल दि. 24 रोजी कराड येथे सापळा लावून दहा लाखाच्या एकूण मागणीपैकी पाच लाखाचा पहिला हप्ता स्वीकारत असताना कराड पालिकेतील कर्मचारी तौफिक शेख याला रंगेहात पकडण्यात आले. यामध्ये कराड पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे, सहा. नगररचनाकार शिरगुप्पे, तौफिक शेख व खाजगी सम अजिंक्य देव यांच्यावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, सातारा एसीबीने सहा. रचनाकार स्वानंद दिलीप शिलगुप्पे व तौफिक शेख यांना ताब्यात घेतले आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
पुढील बातमी
ईएसआयसी हॉस्पिटलचे काम तातडीने सुरू करावे

संबंधित बातम्या