ऐन निवडणूकीत इच्छुकांकडून देवाचा धावा

पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार भक्तांना देवदर्शनाची लॉटरी ; खाजगी ट्रॅव्हल्स जोमात

by Team Satara Today | published on : 12 November 2025


सातारा : सातारा जिल्ह्यात ९ नगरपालिका आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकांची धामधूम एकीकडे सुरू असताना दुसरीकडे इच्छुक उमेदवाराकडून मतदारांसाठी देवदर्शनाच्या सहली सुरू झाल्या आहेत. फुकटात प्रवास जेवण आणि देवदर्शन मिळत असल्यामुळे विठ्ठल, हरी जय जय..‌. विठ्ठल असे म्हणत भक्तगणांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे. विशेष म्हणजे या भक्तांमध्ये महिलांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. 

सातारा जिल्ह्यात सातारा, कराड, मलकापूर, रहिमतपूर, म्हसवड, फलटण, वाई, पाचगणी आणि महाबळेश्वर या ९ नगरपालिकांसह मेढा नगरपंचायतीसाठी निवडणुकीची घोषणा झाली आहे. या निवडणुकीमध्ये उमेदवारी निश्चित होण्यासह मतदारांना आकर्षित करण्यासाठी इच्छुक उमेदवाराकडून अनेक फंडे वापरले जातात. यातीलच एक प्रचलित प्रकार म्हणजे मतदारांना देवदर्शनाच्या सहली घडविल्या जातात. सातारा जिल्ह्यातील पुसेगाव, गोंदवले, शिंगणापूर या तीर्थक्षेत्राला लागूनच नजीकच्या सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, तुळजापूर हि ठिकाणी एकाच मार्गावर असल्यामुळे या तीर्थक्षेत्रांना अधिक पसंती देण्यात येत आहे. चार दिवसापूर्वी सातारा नगरपालिकेसाठी इच्छुक असणाऱ्या एका उमेदवाराने पाच खाजगी ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून आपल्या प्रभागातील मतदारांना देवदर्शन घडविल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे या सहलीमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणावर आपला सहभाग नोंदवला होता. 

दोन दिवसांपूर्वी सातारा, सोलापूर जिल्ह्यासह सातारा जिल्ह्यातून ४० खाजगी ट्रॅव्हल्स मतदार भक्तांना घेऊन देवदर्शनासाठी कोल्हापुरात दाखल झाल्या होत्या. सातारा पाठोपाठ पुणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर देवदर्शनासाठी खाजगी ट्रॅव्हल्स कोल्हापुरात दाखल झाल्यामुळे खानविलकर पेट्रोलपंप परिसर, पंचगंगा नदी घाट, एस्टर पॅटर्न हायस्कूल आणि दसरा चौकात ट्रॅव्हल्स पार्किंग करून पोलिसांनी वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला होता. कोल्हापुरात दर्शन घेतल्यानंतर या ट्रॅव्हल्स ज्योतिबाकडे रवाना झाल्या होत्या. एकूणच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देवदर्शनाचा लाभ मिळाला हा आनंद मतदार भक्तांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असल्याचे चित्र दिसत होते.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यातील रस्त्यांवर तृतीय पंथियांकडून नाकाबंदी
पुढील बातमी
राष्ट्रवादीकडे इच्छुकांची गर्दी; महायुतीची साताऱ्यामध्ये कमरा बंद खलबते, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी घेतला आढावा, समविचारी पक्षांशी महत्त्वपूर्ण चर्चा

संबंधित बातम्या