महावितरण बारामती परिमंडलाच्या मुख्य अभियंतापदी धर्मराज पेठकर

by Team Satara Today | published on : 02 January 2025


बारामती : महावितरण बारामती परिमंडलाचे ८ वे मुख्य अभियंता म्हणून धर्मराज पेठकर यांनी बुधवारी (दि. १) पदभार स्विकारला असून, नवीन वर्षात बारामतीला नवीन अभियंता मिळाल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले आहे.

मुळचे लातूर जिल्ह्यातील असलेले धर्मराज पेठकर यांनी तत्कालिन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात १९९४ साली कनिष्ठ अभियंता म्हणून वीज क्षेत्रातील सेवेला सुरुवात केली. २००६ साली ते कार्यकारी अभियंता झाले. भांडुप, ठाणे, कल्याण, निलंगा, सांघिक कार्यालय, पुणे व सातारा येथे त्यांनी कार्यकारी अभियंता म्हणून जबाबदारी सांभाळली. २०१७ मध्ये ते अधीक्षक अभियंता पदी कल्याण, पुणे व कोकण प्रादेशिक विभागात तर २०२० पासून २०२४ पर्यंत त्यांनी सांगली मंडलचे अधीक्षक अभियंता म्हणून काम केले आहे. डिसेंबरच्या अखेरीस सांघिक कार्यालयाने पेठकर यांची पदोन्नतीवर बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून पदस्थापना केली होती. त्यानुषंगाने नूतन वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्य अभियंता पदाचा पदभार स्विकारला व कामाला सुरुवात केली. कर्तव्यनिष्ठ, ग्राहकाभिमुख तसेच कर्मचाऱ्यांप्रती प्रेमळ असलेले अभियंता म्हणून पेठकर यांची ओळख आहे.

टीमवर्कने काम करु : धर्मराज पेठकर

पदभार स्विकारताच नूतन मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांनी बारामती परिमंडलातील वरिष्ठ अभियंते व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ते म्हणाले, आपण सर्व जण एक टीम म्हणून काम करु व आपल्याला वेळोवेळी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करु. विजेची हानी कमी करणे व वसुलीत बारामती नंबर एकवर ठेवणे हेच माझे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
डी. जी. कॉलेजमध्ये मध्ये स्टेट बँक भरतीचे मार्गदर्शन
पुढील बातमी
नगरवाचनालयात चरित्रविषयक ग्रंथप्रदर्शन सुरू !

संबंधित बातम्या