सातारा : सातारा शहराला मटका, जुगार आणि तीन पानी जुगार, अवैध दारूचा चांगलाच विळखा पडला असताना, संपूर्ण सातारा शहर आता चक्री जुगाराच्या जबड्यात सापडले आहे. या संदर्भात काहींनी सातारा पोलीस अधीक्षक, शाहूपुरी तसेच सातारा शहर पोलीस ठाण्याकडे तोंडी तसेच निवेदनाद्वारे तक्रारी केल्या असता शहर पोलीस मात्र दिवाळी साजरी करण्यात मश्गूल आहेत. या संदर्भात अधिक माहिती घेतली असता, चक्री जुगाराच्या बदल्यात दरमहा सातारा शहर पोलीस ठाण्यात १० लाख रुपयांचा हप्ता पोहोचविला जातो? अशा चर्चा सातारा शहरात घडू झडू लागल्या आहेत. त्यामुळे तक्रारी करूनही कोणतीच कारवाई होत नसल्यामुळे ऐन दिवाळीत सर्वसामान्य कुटुंबातील लोकांचे दिवाळे निघाले आहे.
सातारा शहराला गेल्या अनेक वर्षांपासून मटका, जुगार आणि तीन पानी जुगाराचे ग्रहण लागले आहे. शहरातील पोवई नाका, राजवाडा, बसस्थानक, मोळाचा ओढा, शाहूपुरीतील काही भाग आणि शहराचे उपनगर ओळखले जाणाऱे संगमनगर, वाढे फाटा, अजंठा चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर हे अवैध व्यवसाय सुरू आहेत. याचे लोण ग्रामीण भागातही फार मोठ्या प्रमाणावर पोहचले आहे. साताऱ्यात मटक्या संदर्भात सर्वाधिक अधिक कारवाई मटका किंग समजणाऱ्या सलीम कच्छीवर झाल्या आहेत. मात्र प्रत्येक वेळी प्रतिबंधात्मक नोटीस बजावून अवैध व्यवसाय चालकांना अभय देण्याचे काम सातारा शहर पोलीस ठाण्याकडून होत असल्यामुळे सातारा शहरात गेल्या काही महिन्यांपासून चक्री जुगाराचा एक नवीन फंडा सुरू झाला आहे.
शहरातील पोवई नाका, राजवाडा, बसस्थानक, वाढे फाटा, बॉम्बे रेस्टॉरंट, अजंठा चौक, मुथा चौक, संगमनगर ही ठिकाणे अत्यंत गर्दीची समजली जातात. हे ओळखून अगोदर रस्त्यावर चक्री जुगार चालवणाऱ्या व्यवसायिकांनी आता चक्क गाळयामध्ये लाल पडद्याच्या आड चक्री जुगाराच्या माध्यमातून सातारकरांच्या मुंड्या पिरगळण्याचे काम सुरू केले आहे. या प्रकारामुळे अनेकांच्या संसाराची होणारी वाताहात पाहून काही जागृत आणि संवेदनशील नागरिकांनी याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्याकडे तोंडी तर काहींनी लेखी निवेदने देऊन संबंधित चक्री जुगार बंद करावेत, अशी मागणी केली असतानाही सातारा शहर पोलीस ठाण्याने केवळ बोटचेपी भूमिका घेतल्यामुळे शहर पोलीस ठाण्याच्या कारभारावर फार मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत प्रस्तुत प्रतिनिधीने चक्री जुगाराशी संबंधित असणाऱ्या काही जणांकडे चौकशी केली असता सातारा शहरातील चक्री जुगारअड्डा चालकांकडून शहर पोलीस ठाण्याला प्रति महिना १० लाख रुपयांचा हप्ता पोहच केला जातो. हप्ता घेतात तर चक्री जुगार व्यवसाय बंद करण्याची त्यांची काय बिशाद आहे? असा प्रतिप्रश्न संबंधितांकडून विचारला जात असल्यामुळे सातारा शहर पोलीस ठाण्याचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता चक्री जुगार व्यवसायात रोजची कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असल्यामुळे या व्यवसायात आता शहर व उपनगरातील स्वयंघोषित युवा नेते होऊ पाहणाऱ्यांनी प्रवेश केला असून हे युवा नेते मोठमोठ्या नेत्यांच्या पुढेमागे करत या व्यवसायातील आपले बस्तान बसवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि हाच गैर मार्गाने कमवलेला पैसा येवू घातलेल्या निवडणुकांमध्ये वापरला जाण्याची शक्यता अधिक आहे. मिळालेल्या माहितीनुसार सातारा शहरातील काही झोपडपट्टयांसह गर्दीने गजबजलेल्या ठिकाणी रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी ठिकठिकाणी चक्री जुगार अड्डे सुरू केले आहेत. त्यांनाही खाकीचे अभय मिळाल्यामुळे ते आणखी हातपाय पसरु लागले आहेत. सातारा शहर पोलीस ठाण्याच्या कारभाऱ्यांनी बिदागीच्या पाठीमागे न ठेवता संबंधित चक्री जुगार अड्डयावर कारवाई करून त्यांच्यावर होत असलेल्या हप्त्यांच्या आरोपांना पूर्णविराम द्यावा तसे न झाल्यास भविष्यकाळात सातारा शहर चक्री जुगार अड्डयाचे उगमस्थान म्हणून ओळखले जाईल एवढेच नव्हे तर, पैसे दिले तर आम्ही अवैद्य चक्री जुगाराचा परवाना सुद्धा देवू अश्या फुशारक्या मारायला ही शहर पोलीस ठाण्याचे कारभारी कचरणार नाहीत. भविष्यात अशा प्रकारच्या अवैध व्यवसायाच्या वादातून टोळी युद्ध भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्याचे कर्तव्यनिष्ठ पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी या प्रकरणात लक्ष्य घालून सातारा शहर पोलीस ठाण्याच्या कारभाऱ्यासह चक्री जुगार चालवणाऱ्यांच्या नांग्या ठेचाव्यात अशी मागणी पिडीतांकडून होत आहे.
अरे ओ सांभा.. दाल में कुछ काला है !
कोणताही मोठा सण आला की, सातारा शहर पोलीस ठाण्याच्या कारवाया बासनात गुंडाळल्या जातात, हे अनेकदा स्पष्ट झाले आहे. दिवाळी हा सण तर सुख आणि समृद्धीचा. सुखापेक्षा समृद्धी महत्त्वाची, यापूर्वी मटका अथवा जुगार अड्डयावर पोलिसांनी छापा टाकला असता, २ हजार, १ हजार एवढेच नव्हे तर ४०० रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली तरी, सातारा शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी स्वतःची पाठ थोपटून घेत होते. आता तर चक्री जुगाराच्या माध्यमातून सातारकरांची रोज कोट्यावधी रुपयांची फसवणूक होत असताना सातारा शहर पोलीस ठाण्याच्या कारभाऱ्यांनी चुप्पी साधल्यामुळे अरे.. ओ..सांभा.. दाल में कुछ काला है, अशी म्हणण्याची वेळ सातारकरांवर आली आहे.
२ लाख चक्री जुगारात हरला अन् कुटुंबाने केला शिमगा
चक्री जुगारासंदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, याकडे अनेक शिक्षित युवक आणि नागरिकांचा ओढा मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याचे सांगितले जात आहे. ऐन दिवाळीमध्ये साताऱ्यात वास्तव्य करणाऱ्या एकाने आपल्या खासगी व्यवसायासाठी २ लाख रुपयांचे कर्ज काढले होते. मात्र काही वाईट संगतीच्या मित्रांच्या भुलथापांना बळी पडून त्याने ते सर्व पैसे चक्री जुगारात लावले. हे सर्व पैसे तो हरल्यामुळे त्याच्यावर डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ तर आलीच त्यापेक्षा वाईट म्हणजे ऐन दिवाळीत त्याच्या कुटुंबावर शिमगा करण्याची वेळ आली.
पोलीस अधीक्षक 'चक्री'चा चक्रव्यूह भेदणार का?
यापूर्वी सातारा जिल्ह्यात के.एम.एम प्रसन्ना, डॉ. अभिनव देशमुख, संदीप पाटील, तेजस्वी सातपुते, अजयकुमार बन्सल या पोलीस अधीक्षकांनी अत्यंत तडफदारपणे कारवाई करत अवैध व्यवसायिकांचे कंबरडे मोडल्याचा इतिहास आहे. साताऱ्यातील मटका, जुगार व्यावसायिकांच्या मुसक्या आवळत त्यांनी तुमची दादागिरी आमच्यासमोर चालणार नाही. हे कृतीतून दाखवून दिले होते. हे संपूर्ण जिल्ह्याने पाहिले आहे. अशाच प्रकारची आक्रमक पावले विद्यमान पोलीस अधीक्षक तुषार दोशी उचलणार आहेत की नाही? असा प्रश्न उपस्थित करत सातारा शहरासह परिसरातील अवैद्य चक्री जुगार व्यवसायिकांचे चक्रव्यूह भेदुन, आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी चक्री जुगार पीडित कुटुंबियांकडून पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांच्याकडे करत आहेत.
(क्रमशः)