वडूज : लोकप्रिय सिने अभिनेते तसेच हास्य कलाकार भाऊ कदम यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत खटाव तालुक्यातील वरुड येथे स्नेह भेट दिली. यावेळी त्यांनी विविध विकास कामे पाहिली आणि समाधान व्यक्त केले.
या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, गटविकास अधिकारी योगेश कदम, सहायक गटविकास अधिकारी जयवंत दळवी, ग्रामपंचायत विस्ताराधिकारी माधव बोईनवाड तसेच सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. भाऊ कदम यांनी जलसरोवर ,घरकुल, मियावाकी जंगल, जलतरा प्रकल्प इत्यादी ठिकाणी भेट देऊन विविध उपक्रमांचे कौतुक केले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज योजनेअंतर्गत विविध उपक्रम राबवले जात आहेत. श्रमदानापासून प्रबोधनापर्यंत सर्व पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.
याच अंतर्गत समाजातील सेलिब्रिटींची लोकप्रियता पाहून शासनाने सेलिब्रिटींची भेट देखील आयोजित केले आहे. त्यानुसार अभियानाच्या प्रचार प्रसिद्धीसाठी सिनेअभिनेते,कॉमेडी स्टार लोकप्रिय कलाकार भाऊ कदम व त्यांची टीम वरुड येथे आली होती.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत सहभाग झालेल्या वरुड गावाने केलेल्या कामकाजाचे पाहणी करण्यासाठी तसेच अभियानाची प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी नामदार जयकुमार गोरे ग्रामविकास तथा पंचायत राज मंत्री यांच्या संकल्पनेतून अभियान राबवले जात आहे.कलाकारांची लोकप्रियता पाहता समाजाशी त्यांचा मनोरंजनाच्या माध्यमातून संबंध येतो. त्यांच्याशी संवाद साधायला जनता उत्सुक असते हेच ओळखून श्री कदम यांना निमंत्रित करण्यात आले होते. संपूर्ण पाहणी नंतर भाऊ कदम यांनी ग्रामस्थांशी खुमासदार शैलीमध्ये संवाद साधला आणि वरुड गावाला या अभियानातील यश मिळण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक गटविकास अधिकारी योगेश कदम यांनी केले. विस्ताराधिकारी यशेंद्र क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. सहाय्यक गटविकास अधिकारी जयवंत दळवी यांनी आभार मानले.