'आहे रे आणि नाही रे'मधील दरी हिरवाईत कमी होते - डॉ. सोमनाथ साबळे, कै. पांडुरंग चौगुले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा ‘हिरवाई’ पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात

by Team Satara Today | published on : 20 February 2026


सातारा : समाजात ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ यांची दरी कायम राहणारच आहे ; मात्र हिरवाईच्या माध्यमातून संध्या चौगुले ही दरी कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. प्रत्येकामध्ये एक सकारात्मक प्रेरणा असते; ती ओळखण्यासाठी सजगता आवश्यक आहे. समाजातील एखादी उणीव आपण भरून काढू शकतो,फक्त ती जाणीव होणे गरजेचे आहे, असल्याचे मत डॉ. सोमनाथ साबळे यांनी व्यक्त केले. 

कै. पांडुरंग चौगुले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा ‘हिरवाई’ पुरस्कार वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.  यावेळी ते बोलत  होते. यावेळी सन 2025 सालचा 15वा ‘हिरवाई’ पुरस्कार मुंबईच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांच्या हस्ते मेजर वसंत जाधव यांना प्रदान करण्यात आला; आणि 2026 सालचा 16वा पुरस्कार, इंडियन नेवीचे कमोडर  शिवाजी यादव यांच्या हस्ते रश्मी अतुल भातखळकर यांना प्रदान करण्यात आला.

प्रा. संध्या चौगुले यांनी पाहुण्यांचे स्वागत करत प्रास्ताविकातून पुरस्कार देण्यामागची भूमिका व्यक्त केली. 

पुरस्काराला उत्तर देताना रश्मी भातखळकर म्हणाल्या की, समाजसेवा ही कर्तव्य म्हणून नव्हे, तर सहजभावातून व्हावी, असे मला मनापासून वाटते. हिरवाई सारख्या सातत्याने समाजसेवेचे काम करणाऱ्या संस्थेने दिलेल्या पुरस्काराची गरिमा टिकवणे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. कै. पांडुरंग चौगुले स्मृतीप्रित्यर्थ मिळालेला हा माझ्या आयुष्यातील पहिला पुरस्कार असून ही मोठी जबाबदारी मी स्वीकारत आहे. 

मेजर वसंत जाधव यांनी मनोगतात सांगितले की, “अतिरेकी कारवायांच्या संकटात नागरिकांचे प्राण वाचवणे म्हणजे समाजाला सुरक्षित व सशक्त भविष्य देणे होय. ही जबाबदारी पार पाडताना मला जे काही करता आले, ते या महान देशामुळेच. पुन्हा संधी मिळाली, तरी मी अभिमानाने हाच मार्ग निवडेन.”

प्रमुख पाहुण्या डॉ. शुभा राऊळ यांनी हिरवाई प्रकल्पाचे कौतुक करताना सांगितले की, “आज सर्वत्र झाडांची संख्या घटत असताना ‘हिरवाई’च्या माध्यमातून फुलपाखरे आणि पक्ष्यांसाठी हिरवाईच्या माध्यमातून जणू एक निसर्गसंकुल उभारले आहे. त्याबरोबरच त्यांची माणसं जोडण्याची तपश्चर्या अव्याहातपणे सुरू आहे. मेजर वसंत जाधव यांच्यासारख्या शूरवीरांना शोधून सन्मानित करून चांगुलपणा रुजवण्याचे कार्यही सातत्याने केले जात आहे.”

कमोडोर शिवाजी यादव म्हणाले, “आपल्या आयुष्यात सर्वसमावेशकता अत्यंत महत्त्वाची आहे. रश्मी भातखळकर यांच्यामध्ये ही सर्वसमावेशक वृत्ती ठळकपणे दिसते. त्या करत असलेले काम हे त्यांच्या अंतःप्रेरणेतून होते आणि ते करताना त्यांना एक वेगळी समाधानाची अनुभूती मिळते. मेजर वसंत जाधव हे खरे धैर्यवान व्यक्तिमत्त्व असून त्यांच्या रूपाने आपल्या समोर एक युद्धनायक उपस्थित आहेत. जीवन आणि मृत्यूच्या सीमारेषेवर उभे राहून त्यांनी ‘स्वतःपेक्षा देशसेवा श्रेष्ठ’ या भावनेतून कार्य केले आहे.”

श्रुतिका आणि धनंजय चौगुले, गिरीजा शिंदे, इरा यादव, उद्योजिका नंदा जाधव यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजया निकाळजे यांनी केले. तर डॉ. चित्रा दाभोलकर यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी समीर मोहिते, ऍड. वर्षा देशपांडे, डॉ. युगंधर सरकाळे, गीता मामनिया, वैशाली मंडपे, मल्लिका पाटणकर, मोहन जगताप, प्राचार्य वंदना नलवडे, माधुरी माने, चांदणी शिंदे, वंदना साबळे आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शिवजयंती दिनी सातारा झाला शिवमय; जय शिवाजी जय भारत मेगा पदयात्रेत 12 हजारांहून अधिक सहभागी

संबंधित बातम्या