पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ मतदार यादी प्रसिद्ध; अद्याप नोंदणी नसलेल्या पात्र मतदारांनी नोंदणी करावी - जिल्हाधिकारी संतोष पाटील

by Team Satara Today | published on : 12 January 2026


सातारा  :  विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची   यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. अद्यापर्यंत ज्या पात्र मतदारांनी मतदार नोंदणी केली नाही अशांनी  पद निर्देशित अधिकारी तसेच सर्व प्रांताधिकारी कार्यालय आणि सर्व तहसील कार्यालय येथे तसेच मुख्य निवडणूक आयोगाच्या https://mahaelection.gov.in/Citizen/Login या संकेतस्थळावर नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.

पदवीधर मतदार यादीत नाव नोंदणीसाठी  फॉर्म १८ भरावा. मतदार हा भारताचा नागरिक,  सातारा जिल्हयातील सर्वसाधारण रहिवास असावा तसेच 1 नोव्हेंबर 2022  या दिनांका पुर्वी पदवीधारक किंवा समकक्ष पदवीका असणे आवश्यक आहे.

शिक्षक मतदार यादीत नाव नोंदणीसाठी  फॉर्म 19 भरावा. मतदार हा  भारताचा नागरिक असावा,  सातारा जिल्हयातील सर्वसाधारण रहिवास तसेच  मागील 6 वर्षात म्हणजे 1 नोव्हेंबर 2019 नंतर कमीत कमी तीन वर्ष मान्यता प्राप्त माध्यमिक शाळेत पूर्ण वेळ शिक्षक म्हणून कामकाज केले असणे आवश्यक आहे. तसेच मतदार यादीवर हरकती घेण्यासाठी फॉर्म 7  व मतदार यादीच्या तपशीलात दुरुस्ती करण्यासाठी फॉर्म ८ भरावा.

अंतिम मतदार यादी  https://www.satara.gov.in   या संकेतस्थळावर देखील पाहण्यासाठी उपलब्ध आहे. सदर मतदार यादीवर कोणाला आक्षेप अथवा दावे सादर करायचे असतील किवा नवीन नावाची नोंदणी करावयाची असले तर त्यांनी पद निर्देशित अधिकारी तसेच सर्व प्रांताधिकारी कार्यालय आणि सर्व तहसील कार्यालय येथे सादर सादर करावीत. 

ज्या मतदारांनी चालू मतदार यादीत पदवीधर किंवा शिक्षक म्हणून नोंदणी केली आहे, त्यांनी देखील यादीत नाव असल्याची खात्री करावी. याद्या नव्याने तयार होत असल्याने, जुन्या याद्या रद्दबातल मानल्या जातील. सर्व पात्र नागरिकांनी लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवून आपले नाव मतदार यादीत समाविष्ट व अद्ययावत करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भाजपची पुन्हा नाचक्की; बदलापूर प्रकरणातील आरोपी तुषार आपटेचं नगरसेवकपद २४ तासांमध्येच गेलं
पुढील बातमी
मातृतीर्थ सिंदखेडराजा विकासाचा नवीन आराखडा तयार करणार - पालकमंत्री मकरंद पाटील यांच्याकडून जिजाऊं माँसाहेबांना अभिवादन

संबंधित बातम्या