साहित्यिक, साहित्य प्रेमींच्या स्वागतासाठी सातारानगरी सज्ज; सारस्वतांच्या उत्सवाला साताऱ्यात दिमाखदार साहित्य दिंडीने होणार प्रारंभ

by Team Satara Today | published on : 31 December 2025


सातारा  : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून सातारा नगरी सारस्वत आणि साहित्यप्रेमींच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. तब्बल ३३ वर्षांनंतर साताऱ्यात साहित्यिकांचा आनंदमेळा जमणार असल्याने सातारकरही हा साहित्याचा भव्यदिव्य सोहळा अनुभवण्यासाठी उत्सुक आहेत. शतकपूर्व संमेलन अनेक नवनवीन संकल्पना घेवून पुढे येत आहे. नव्या रितीरिवाजांचे पायंडेही पाडत आहे. 

संमेलन सर्वोत्तम व्हावे याकरिता आयोजकांसह साताऱ्यातील प्रत्येक नागरिक सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. साताऱ्यातील वैशिष्ट्यपूर्ण चवीचे सुग्रास भोजन साहित्यिकांचे रसनारंजन करणार आहे तर विशेष निमंत्रित साहित्यिकांची खास बडदास्त ठेवण्यात येणार असून त्यांना चांदीच्या ताटात भोजन देऊन मराठ्यांच्या राजधानीत त्यांचे प्रेमाने कौडकौतुक केले जाणार आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा शाहूपुरी (सातारा) आणि मावळा फौंडेशनतर्फे नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून, दि. १ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत शाहू स्टेडियम येथे ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेमलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दिमाखदार ग्रंथदिंडीने साहित्यसंमेलनाच्या सोहळ्याने गुरुवारी (दि. १) प्रारंभ होणार आहे.

ऐतिहासिक सातारा नगरीकडे संमेलनानिमित्त येणाऱ्या साहित्यिक व साहित्यप्रेमींच्या स्वागतासाठी सातारा जिल्ह्याच्या हद्दीपासून महामार्गावर भव्य फलक उभारण्यात आले आहेत. महामार्गावरून जाणाऱ्या प्रत्येकाचे हे फलक लक्ष वेधून घेत आहेत. स्थानिक जिल्हा प्रशासन आणि नगरपालिकेतर्फे शहराचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. शहरातील प्रमुख रस्त्यावर ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, मावळा फौंडेशन तसेच साहित्य संमेलन संरक्षक संस्थेची बोधचिन्हे जागोजागी लावण्यात आली आहेत. संमेलनाचे नाव आणि बोधचिन्ह दर्शविरा आकाशफुगाही मोठ्या दिमाखाने आकाशात विहरत असून सातारकरांचे लक्ष वेधून घेत आहे.

९९वे साहित्य संमेलन शहराच्या मध्यवर्ती भागातील १४ एकरात असलेल्या छत्रपती शाहू स्टेडियम येथे होत आहे. याच स्टेडियमवर १९९३  साली ६६ वे संमेलन दिमाखात साजरे झाले होते हा मोठा योगायोग आहे. येथे मुख्य मंडपासह ग्रंथ प्रदर्शन, कवी-गझल कट्टा यासाठी स्वतंत्र मंडप उभारण्यात आले आहेत. इतर तीन सभागृहांमध्येही विविध साहित्यिक उपक्रम राबविले जाणार आहेत. मुख्य मंडपाची आसन क्षमता सुमारे दहा हजार असून ग्रंथप्रदर्शनासाठी नऊ फूट बाय नऊ फूट आकाराचे जर्मन हँगरचे २५४ गाळे उभारण्यात आले आहेत. विशेष म्हणजे संमेलनाच्या मुख्य मंडपात ग्रंथदालनातूनच जावे लागणार असल्याने हाही परिसर साहित्य प्रेमींच्या गर्दीने फुलून जाणार आहेत. संमेलन स्थळ सातारा बस स्थानकापासून पायी चालत जाण्याच्या अंतरावर असल्याने बाहेरून येणाऱ्या साहित्य रसिकांना येथे सहजतेने पोहोचता येणार आहे. संमेलनस्थळाच्या पाठीमागील बाजूस वाहनतळाची व्यवस्था मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे.

संमेलनस्थळ परिसरात येणाऱ्या साहित्य प्रेमींच्या सोयीसुविधा आणि सुरक्षेच्या दृष्टीनेही विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी वर्ग उपलब्ध राहणार असून दोन रुग्णवाहिका संमेलनस्थळी कायमस्वरपी असणार आहेत. स्वच्छतेच्या दृष्टीनेही खबरदारी घेण्यात येत असून संमेलनस्थळी शंभरहून अधिक स्वच्छतागृहांची सोय करण्यात आली आहे, तसेच दर तासाला साफसफाई केली जाणार आहे. विद्युत पुरवठ्यात खंड पडू नये यासाठी विद्युत मंडळाचे कर्मचारी येथे असणार आहेत. अग्निशमन दलाचे तीन बंब संमेलनस्थळी २४ तास राहणार आहेत. 

शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस प्रशासन आणि परिवहन विभागाचेही सहकार्य घेण्यात येत आहे. संमेलनास येणाऱ्या अतिविशिष्ट व्यक्तींचा संमेलनस्थळी येण्याचा मार्ग स्वतंत्र असून सातारकर तसेच साहित्यरसिकांना कुठल्याही अडथळ्याविना संमेलनाचा आनंद घेता येणार आहे.मराठ्यांची राजधानी असलेल्या ऐतिहासिक सातारा नगरीत साहित्यिक आणि साहित्यप्रेमी यांचे संमेलनाचा स्वागताध्यक्ष या नात्याने स्वागत करतो. या संमेलनाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण सातारा जिल्ह्याचे तसेच साहित्यप्रेमींचे लक्ष लागलेले आहे. साताऱ्याच्या नावलौकिकाला साजेसे असे यंदाचे संमेलन होईल असा विश्वास आहे.

श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, स्वागताध्यक्ष, अ. भा. मराठी साहित्य संमेलन

दरवर्षी होणाऱ्या संमेलनांपेक्षा यंदाचे संमेलन कार्यक्रमांच्या वैविध्यपूर्ण आयोजनामुळे अनोखे ठरणार आहे. सातारा येथे होत असलेले शतकपूर्व संमेलन गुणवत्तेची उंची गाठत अभूतपूर्व ठरेल असा विश्वास आहे.

प्रा. मिलिंद जोशी, अध्यक्ष, अ. भा. मराठी साहित्य महामंडळ

सातारा येथे संमेलन आयोजित करण्याचा मान मिळावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते. साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा आणि मावळा फौंडेशनला शतकपूर्व संमेलन आयोजित करण्याचा मान मिळाल्याने सारस्वतांच्या उत्सवात सातारा जिल्ह्याची ओळख दर्शवित संमेलन वैशिष्ट्यपूर्ण आणि लक्षवेधी करण्याचा आमचा सर्वतोपरी प्रयत्न आहे.

विनोद कुलकर्णी, कार्याध्यक्ष, अ. भा. मराठी साहित्य संमेलन


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शिवराज चौकात महामार्गावर भरधाव ट्रकची कारला धडक; स्विफ्ट कारचे दोन लाखांचे नुकसान
पुढील बातमी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात महेश करचे यांचा बोंबाबोंब आंदोलनाचा इशारा

संबंधित बातम्या