विंगमध्ये आढळली दुर्मिळ धुळनागीण

by Team Satara Today | published on : 29 May 2025


कराड : विंग-वेताळवाडी, ता. कराड येथे बुधवारी दुपारी एका घरानजीक दुर्मीळ धुळनागीण जातीचा सर्प आढळून आला. सर्पमित्रांनी त्या ठिकाणी धाव घेत तयाला ताब्यात घेतले. तसेच त्याला सुरक्षितरीत्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.

विंग-वेताळवाडी येथील पोपट शंकर नलवडे हे त्यांच्या घरानजीक काम करीत होते. त्यावेळी त्यांना हा साप दिसला. त्यांनी कऱ्हाडमधील वाइल्डहार्ट रेस्क्यू या संस्थेचे सदस्य असलेल्या मलकापूर येथील विशाल साठे यांना ही माहिती दिली. साठे यांनी घटनास्थळावरुन हा सर्प सुरक्षितरीत्या पकडला. 

संबंधित सर्प बिनविषारी धुळनागीण असल्याचे विशाल साठे यांच्या निदर्शनास आले. या सर्पाचा रंग नागासारखा तपकिरी असतो. तसेच अंगावर खवले असतात. या जातीचा सर्प कऱ्हाडमध्ये पहिल्यांदाच ‘रेस्क्यू’ करण्यात आला आहे. यापूर्वी ठिकठिकाणी धुळनागीण दिसून येत होती. मात्र, त्याला पकडण्यात आले नव्हते.

धुळनागीण हा सर्प डोंगराळ भाग, गवताळ प्रदेशात आढळतो. सध्या या सर्पांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. शेतीमध्ये केली जाणारी औषध फवारणी, रासायनिक खतांचा वापर यांमुळे हे साप दुर्मीळ झाले आहेत.

विंग येथे पकडलेला हा सर्प हे नुकतेच जन्मलेले पिल्लू होते. पूर्ण वाढ झाल्यानंतर हा साप हुबेहूब नागासारखा दिसतो. भुसभुशीत मातीमध्ये त्याचे वास्तव्य असते. सापसुरळी, बेडूक व दगडांच्या खाचीमध्ये राहणारे प्राणी हे त्याचे खाद्य असल्याचे विशाल साठे यांनी सांगितले.

पिकांवर होणारी औषधफवारणी, रासायनिक खतांचा वापर तसेच दगडखाणींमुळे हा सर्प दुर्मीळ होत चालला आहे. या सर्पाला वन्यजीव कायद्यान्वये संरक्षण आहे. - योगेश शिंगण, सर्पमित्र, प्राणी अभ्यासक, कराड


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
निकष पूर्ण करणाऱ्या अंगणवाडी केंद्रांना प्रोत्साहन भत्ता देणार
पुढील बातमी
एन.डी.आर.एफ.ची पथक कराड येथे दाखल

संबंधित बातम्या