फलटण : फलटणच्या राजकारणात पुन्हा एकदा शब्दयुद्ध पेटले आहे. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी काही दिवसांपूर्वी “फलटणच्या विकासासाठी मनोमिलन आवश्यक आहे” अशी भूमिका मांडली होती. मात्र, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना त्यांना टोला लगावला आहे. “प्रेम करायचं एक वय असतं; पण त्यांना हे उतारवयात प्रेम सुचलंय. प्रेम करायचं वय आता निघून गेलंय,” असे वक्तव्य करून गोरे यांनी रामराजेंच्या मनोमिलनाच्या प्रस्तावावर स्पष्टपणे नकाराचा शिक्का मारला आहे.
ना. गोरे म्हणाले की, “रामराजेंनी सत्ता असताना लोकांना त्रास दिला. लोकांची घरं देशोधडीला लावण्याचं काम त्यांनी केलं. आता जनतेचा विश्वास गमावल्यामुळे आणि असुरक्षितता निर्माण झाल्यामुळे त्यांना प्रेम आठवू लागलं आहे. सत्तेच्या सुखात राहणाऱ्यांना सत्तेबाहेर गेल्यावर समाजकारण आणि राजकारणाचं खरं स्वरूप लक्षात येतं.”
मनोमिलनाची वेळ आता निघून गेली आहे
फलटणच्या राजकारणात माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे या तिघांमधील राजकीय मतभेद सर्वश्रुत आहेत. काही दिवसांपूर्वी रामराजेंनी “मनोमिलन हे एकतर्फी प्रेमातून होत नाही; विकासाचं राजकारण करायचं असेल तर मनोमिलन व्हायला हवं” असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, जयकुमार गोरे यांनी आजच्या प्रतिक्रियेत स्पष्ट केले की, “मनोमिलनाची वेळ आता निघून गेली आहे.”
मनोमिलनाच्या प्रस्तावावर मंत्री जयकुमार गोरे यांचा स्पष्ट नकार
ना. गोरे म्हणाले, “रामराजे आता हतबल झाले आहेत, असं मी म्हणणार नाही. पण प्रत्येकाची स्वतःची ताकद असते, ती त्यांनी आजमावावी. सत्ता असताना मंत्री, सभापती म्हणून त्यांनी लोकांना त्रास दिला. आता सत्तेतून बाहेर पडल्यावर परिस्थिती वेगळी वाटते. समाजकारण आणि निवडणुकीच्या वास्तवात आल्यावर अनेक गोष्टी लक्षात येतात.” या वक्तव्यामुळे फलटण तालुक्याच्या राजकारणात पुन्हा तापमान वाढल्याचे दिसत आहे. रामराजेंच्या मनोमिलनाच्या प्रस्तावावर मंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट नकार दिल्याने, राजकारणातील ‘मनोमिलना’ची चर्चा सुरू होण्याआधीच फिस्कटल्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत.