नवी दिल्ली : इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स यांची हकालपट्टी करण्याचा इशारा केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी दिला आहे. इंडिगो एअरलाइन्समुळे प्रवाशांना होत असलेल्या गैरसोयीबद्दल नायडू यांनी प्रवाशांची माफी मागितली. तसेच या प्रकरणी दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे नायडू म्हणाले. इंडिगो एअरलाइन्सकडून हे सर्व हेतुपुरस्सरपणे केले जात असल्याची शंका देखील नायडू यांनी व्यक्त केली आहे.
इंडिगो एअरलाइन्सकडून प्रवाशांना होत असलेल्या त्रासाबद्दल नायडू म्हणाले, “इंडिगोकडून होत असलेल्या गैरसोयीबद्दल मी प्रवाशांची माफी मागतो. हवाई क्षेत्र सुरळीतपणे सुरू राहावे, ही मंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे. जेव्हा अशा प्रकारच्या समस्या येतात तेव्हा जबाबदारी आणखी वाढते. या परिस्थितीसाठी कारणीभूत असलेल्या दोषींवर कारवाई करणे, तसेच भविष्यात अशी समस्या निर्माण होऊ नये म्हणून उपाययोजना करणे ही आमची जबाबदारी आहे. प्रवाशांची सुरक्षा आणि हक्क अबाधित ठेवणे महत्वाचे आहे.
इंडिगोकडून हे सगळं हेतुपुरस्सरपणे घडवून आणलं जात आहे, अशी शंका नायडू यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, “इंडिगोची कार्यपद्धती व अंतर्गत नियंत्रण पाहता अशी समस्या निर्माण व्हायला नको होती. हे सगळं आताच का घडलं? व अशी परिस्थिती का उद्भवली ? याचा आम्ही सखोल तपास करत आहोत. तपासानंतर यात दोषी आढळलेल्यांवर आम्ही कडक कायदेशीर कारवाई करू, गरज पडल्यास फौजदारी कारवाई देखील करू असा इशारा नायडू यांनी दिला आहे. पडल्यास इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स यांची हकालपट्टी करू तसेच त्यांच्यावर सर्व प्रकारच्या दंडात्मक कारवाया केल्या जातील, असा इशारा देखील नायडू यांनी दिला आहे. ते म्हणाले, “मागील सात दिवसांपासून माझी व्यवस्थित झोप झाली नाही. मी माझ्या कार्यालयात बसून सतत आढावा बैठका घेत आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) हे प्रकरण कसे हाताळले याची देखील नंतर चौकशी केली जाणार आहे.