गौरवशाली मराठी भाषा टिकवायची असेल तर ज्ञानशाखांमध्ये मराठी सक्ती हवी - गुंफण सद्‌भावना साहित्य संमेलनातील परिसंवादातील सूर

by Team Satara Today | published on : 16 February 2026


सातारा :  आपली भाषा ही आपली माता आहे. मराठी भाषेतून संस्कृतीचा विकास घडतो. तिचा सन्मान करणे आवश्यक आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तरी मराठी शाळा बंद पडण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. संभाषणात इंग्रजीचा वापर अधिक होत आहे. गौरवशाली मराठी भाषा टिकवायची असेल तर विद्यापीठांमध्ये, ज्ञानशाखांमध्ये मराठी सक्तीची व्हावी, असा सूर ‘भारतीय ज्ञान परंपरा व अभिजात मराठी’ या विषयावरील परिसंवादात उमटला.

गुंफण अकादमी (मसूर, जि. सातारा) आणि भारतीय शिक्षण संस्था, कोथरूड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी पुण्यात आयोजित २१ व्या गुंफण सद्‌भावना साहित्य संमेलनात ‘भारतीय ज्ञान परंपरा आणि अभिजात मराठी’ या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय बोरूडे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद झाला. रचना, रूपाली अवचरे, सुनिल उंब्रजकर, नारायण कुंभार यांचा परिसंवादात सहभाग होता. परिसंवादाचे संचलन सुहास आळतेकर यांनी केले. संमेलन कोथरूडमधील जे. पी. नाईक शिक्षण आणि विकास केंद्राच्या संकुलात आयोजित करण्यात आले होते.

नारायण कुंभार म्हणाले, इंग्रजी माध्यमांमध्ये मुलांना शिकविण्याकडे पालिकांचा अधिक कल दिसून येतो. त्यामुळे मराठी शाळा बंद पडत आहेत. पर्यायी शब्द असतानाही मराठी प्रसार माध्यमांमध्ये इंग्रजीची वापर मोठ्या प्रमाणात होत आहे, ही चिंतेची बाब आहे.

रूपाली अवचरे म्हणाल्या, नाट्य, भाषाशास्त्र अशा विविध क्षेत्रात हजारो वर्षांपासून भारतीय ज्ञान परंपरा आहे. भारतीय ज्ञानपरंपरेतील विचारमूल्य अंगीकारल्याने आपण आज चांगले आयुष्य जगत आहोत. नाणेघाट येथील शिलालेख दोन हजार वर्षांपूर्वीचा आहे. त्यातही मराठी भाषेचा गौरव आहे. संतांनी देखील भाषेद्वारेच प्रबोधन केले. मराठी भाषा ही आपली माता असून तिचा सन्मान करणे आवश्यक आहे. 

सुनील उंब्रजकर म्हणाले, आपल्या भारतीय ज्ञान परंपरेचा वारसा समृद्ध आहे. वेद हे आपल्या परंपरेचा पाया आहे. हे आपले ज्ञानकोषच आहेत. ज्ञान परंपरा म्हणजे पुस्तकी माहिती नव्हे, तर अनुभवातून आलेले ते ज्ञान आहे. जीवनाला अर्थ देणारे तत्त्वज्ञान आहे. आपली परंपरा ही जगातील सर्वात प्राचीन आणि सर्वसमावेशक आहे. ही परंपरा निरंतर वाहणाऱ्या नदीसारखी जीवंत आहे. 

रचना म्हणाल्या, मराठी भाषेच्या शब्दांत अमृताची गोडी आहे. मराठी भाषेतून संस्कृतीचा विकास घडतो. त्यामुळे मराठी ही गौरवशाली भाषा आहे. विज्ञान, तर्कशास्त्र, योग, आयुर्वेद या सर्व क्षेत्रातील ज्ञानाने जगाला दिशा दिली आहे. अभिजात भाषेचा दर्जा हा केवळ शिक्का नाही, तर दोन हजार वर्षांपूर्वीपासूनच्या ज्ञानपरंपरेचा सन्मान आहे. आध्यात्मिकता ही केवळ भारताचीच ज्ञान परंपरा आहे. आत्म्याचा विकास हा ज्ञान परंपरेत झालेला आहे. 

अध्यक्षपदावरून बोलताना संजय बोरूडे म्हणाले, अभिजात म्हणजे उच्च प्रतीचे. मराठीला अभिजात दर्जा मिळाला, तर दुसरीकडे मराठी शाळा बंद पडत आहेत. याविषयी अनेकजण गळा काढत आहेत; पण मराठी धोरणाविषयी कोणीच बोलत नाही. ही दांभिकता आहे. ज्ञानक्षेत्रात, विद्यापीठांमध्ये मराठी सक्तीची करणे आवश्यक आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नटराज मंदिर ट्रस्ट आयोजित महाशिवरात्री संगीत महोत्सवातील अर्पित नृत्यालयाच्या बहारदार कथ्थकने सातारकर मंत्रमुग्ध
पुढील बातमी
छ. संभाजी महाराज स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात, उर्वरित काम तातडीने पूर्ण करावे; खा. उदयनराजे यांच्याकडून सूचना, स्मारक समितीकडून पाहणी

संबंधित बातम्या