मेढा : नगरपंचायतीच्या १७ प्रभागांसाठी दि. ८ रोजी आरक्षण सोडत जाहीर झाली. शासनाच्या या नवीन नियमाच्या आरक्षण सोडत प्रणालीमुळे अनेक इच्छूकांच्या दांड्या गुल झाल्या आहे. त्याचबरोबर अध्यक्षपदाच्या सोडतीमध्ये " ओपन महिला " आरक्षण जाहीर झाल्याने अध्यक्ष पदासाठी इच्छूक असणाऱ्यांना पुन्हा आता पाच वर्षे वाट पाहावी लागणार आहे.
जावळी पंचायत समितीच्या बाबासाहेब आखाडकर सभागृहामध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याधिकारी अजिंक्य पाटील यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडली. यावेळी लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठया काढण्यात आल्या. गेल्या अडीच ते तीन वर्षापूर्वीच कार्यकारिणीची मुदत संपली होती. या कालावधीत दोन वेळा आरक्षण सोडत झाली. शासनाच्या निर्णयानुसार आज पुन्हा आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली. नगराध्यक्ष पद हे निवडून आलेल्या नगरसेवकांमधून की थेट जनतेतून निवडून द्यायचे याचा अद्याप शासनाकडून कुठलाही आदेश आला नसल्याचे मुख्याधिकारी अजिंक्य पाटील यांनी सांगितले.
मेढा नगरपंचायतीसाठी १७ प्रभाग असून सर्व प्रभाग एक सदस्यीय आहेत. आरक्षण पुढील प्रमाणे- प्रभाग १ - अनुसुचित जाती पुरुष, प्रभाग २- अनुसुचित जाती महिला, प्रभाग ३ - अनुसुचित जाती महिला, प्रभाग ४ - ओपन महिला, प्रभाग ५ - ओपन महिला, प्रभाग ६ -ना. मा. प्रवर्ग महिला, प्रभाग ७ - ओपन पुरुष, प्रभाग ८ - ओपन महिला, प्रभाग ९ - ओपन पुरुष,, प्रभाग १० - ना. मा. प्रवर्ग, प्रभाग ११ - ओपन पुरुष, प्रभाग १२ - ओपन पुरुष, प्रभाग १ ३ - ना. मा. पुरुष, प्रभाग १४ - ना मा. प्र. महिला, प्रभाग १५ - ओपन महिला, प्रभाग १६ - ना. मा. प्रवर्ग महिला, प्रभाग १७ - ओपन पुरुष.