ढेबेवाडी : साईकडे (ता. पाटण) गावचे सुपुत्र आदित्य उमेश मोरे यांची ‘आसाम रायफल्स’मध्ये कॉन्स्टेबलपदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थ व मित्रपरिवाराने फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत तळमावले व साईकडेत त्यांची मिरवणूक काढली.
आदित्य मोरे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आहे. त्याचे आई- वडील शेती करतात. शिक्षण घेत असतानाच आदित्यने सैन्य दलात भरती होऊन देशसेवेचे स्वप्न पाहिलेले होते. अथक मेहनत, जिद्द, आत्मविश्वासाच्या जोरावर त्याने हे ध्येय गाठले. नुकतीच त्यांची आसाम रायफल्समध्ये कॉन्स्टेबलपदी निवड झाली. ते समजताच ग्रामस्थ, मित्रमंडळींनी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करत त्याची मिरवणूक काढली.
साईकडेच्या सरपंच सुवर्णा मोरे, उपसरपंच गणेश यादव, तळमावलेचे सरपंच सूरज यादव, विक्रांत मोरे, प्रसाद मोरे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, ग्रामस्थ यांनीही सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दरम्यान, काकासाहेब चव्हाण महाविद्यालयात प्रभारी प्राचार्या डॉ. उषादेवी साळुंखे यांनी सत्कार केला
प्रा. महेश चव्हाण, प्रा. डॉ. विक्रांत सुपुगडे, प्रा. आर. एस. जाधव, प्रा. राजेंद्र भिसे, प्रा. सचिन पुजारी, प्रा. सुनील कुंभार, प्रा. सी. जी. पुटवाड आदी उपस्थित होते. श्री वाल्मीकी विद्यामंदिरात मुख्याध्यापक संजय संकपाळ, शिक्षक, कर्मचाऱ्यांनी सत्कार केला. नवभारत क्रेडिट संस्थेचे संस्थापक व माजी सभापती संजय देसाई यांनी आदित्यचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
माझ्यासह कुटुंबासाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे. ग्रामस्थ, शिक्षक, मित्रपरिवार, पदाधिकाऱ्यांनी पाठीवर टाकलेली कौतुकाची थाप पुढच्या वाटचालीसाठी नक्कीच मोठे बळ देईल. - आदित्य मोरे, कॉन्स्टेबल, आसाम रायफल्स