सातारा : सातार्यात एका खासगी हॉस्पिटल बाहेर रविंद्र ढोणे याच्यासह 25 ते 30 जणांच्या जमावाने एकाला मारहाण केली. संशयितांनी रॉड, दगडाने मारहाण करत सोन्याचा ऐवजही लंपास केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रितम अनिल जानकर (वय 37, शाहूनगर, सातारा) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 15 मे रोजी घडली आहे. तक्रारदार प्रितम जानकर हे हॉस्पिटलबाहेर थांबले होते. त्यावेळी संशयित हा त्याच्या 25 ते 30 साथीदारांसोबत होता. ‘तुला मस्ती आली आहे का? तू पैसे दिले नाही तर तुला गोळ्या घालीन. तुला जिवंत सोडणार नाही,’ अशी धमकी देत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. ’याला मारा, हा पैसे देत नाही,’ असे म्हणताच जमाव तक्रारदार यांना बेदम मारहाण करु लागला. यावेळी जमावाने तक्रारदार यांची एमएच 11 डीएन 0066 या क्रमांकाच्या वाहनाची काच फोडून त्याचे नुकसान केले.
जमाव मोठा असल्याने तक्रारदार यांनी स्वत:चा जीव वाचवण्यासाठी दवाखान्यात धाव घेतली. मात्र जमावाने दवाखान्यात घुसून तेथेही मारहाण केली. यावेळी दवाखान्यातील कर्मचारी वाचवण्यासाठी आल्यानंतर त्यांनाही मारहाण केली. हा मारहाणीत संशयितांनी तक्रारदार यांची हातातील अंगठी चोरुन नेली. या सर्व घटनेनंतर तक्रारदार यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.