सातारा : केळघर ता. जावली येथील एका चार वर्षाच्या चिमुरडीचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला होता. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच हा मृत्यू झाल्याच्या आरोप करत येथील नागरिकांनी ठिय्या आंदोलन करीत संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली.
याबाबत माहिती अशी की, दि. २६ सप्टेंबर रोजी सकाळी श्रीशा मिलिंद घाडगे (वय ४, रा. केळघर, ता. जावळी ) या चिमुरडीला तिची आई सकाळी मांडीवर बसून भात भरवत होती. त्यावेळी तिच्या पायाला सर्पदंश झाला. त्यावेळी ती मोठ्याने किंचाळली. मात्र आईला वाटले, उंदीर किंवा इतर काही असेल म्हणून तिने या किंचाळण्याकडे दुर्लक्ष दुर्लक्ष केले. मात्र काही वेळानंतर घरात असणाऱ्या एका बिळातून साप बाहेर आल्याचे कुटुंबीयांना दिसल्यानंतर घरामध्ये एकच धावपळ उडाली. काही वेळापूर्वी चिमुरडीला उंदीर नव्हे तर, साप चावल्याची खात्री झाल्यानंतर कुटुंबीयांनी तिला तात्काळ सातारा येथील सिविल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
त्या घटनेनंतर केळघर प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी वेळेवर श्रीशावर उपचार न केल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याचबरोबर या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी प्रत्यक्ष तपासणी न करता औषध उपचार करतात. तसेच या रुग्णालयात अधिकारी व कर्मचारी वेळेवर उपलब्ध नसल्याने रुग्णांना उपचार घेण्यास अडचण असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दुर्दैवी चिमुरडीवर या ग्रामीण रुग्णालयात वेळेवर उपचार केल्यास तर कदाचित तिचा जी वाचला असता. आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी योग्य निदान उपचार न केलयामुळे संबंधित चिमुरडीचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
याबाबतचे निवेदनही देण्यात आले असून, उपचारात हलगर्जी करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.