कराड जवळील महामार्गावर थरार; जयसिंगपूरच्या व्यापाऱ्याकडील सुमारे १२ लाखांचा ऐवज लुटला, व्यापारी वर्गात खळबळ

by Team Satara Today | published on : 21 December 2025


​कराड : कराड-कोल्हापूर महामार्गावर पाचवड फाट्याजवळ एका कागद व्यापाऱ्याचे फिल्मी स्टाईलने अपहरण करून, शस्त्राचा धाक दाखवत १५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी व्यापाऱ्याकडील सुमारे १२ लाखांचा ऐवज लुटून पलायन केले आहे. या घटनेने व्यापारी वर्गात खळबळ उडाली असून, कराड पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

निकेत श्रीभगवान बियाणी (वय ४३, रा. जयसिंगपूर) हे 'पेपर अँड पेपर प्रॉडक्ट्स'चे व्यावसायिक आहेत. गुरुवारी (दि. १८) सायंकाळी साताऱ्याहून वसुली करून ते आपल्या चालकासह (नवनाथ चोरमुले) एमएच १२ यूएम २२०० या कारने जयसिंगपूरकडे परतत होते. कराडमधील काम आटोपून पाचवड फाट्याजवळ आले असता, सायंकाळी ६:४० च्या सुमारास मागून आलेल्या एका कारने त्यांच्या गाडीला धडक दिली.

अपघात झाल्याचे भासवून, धडक दिलेल्या कारमधून चार अज्ञात व्यक्ती खाली उतरल्या. त्यांनी बियाणी यांच्या कारमध्ये जबरदस्तीने प्रवेश केला. यावेळी चाकू आणि लाकडी दांडक्याचा धाक दाखवून बियाणी आणि त्यांच्या चालकाला मारहाण करण्यात आली. आरोपींनी गाडीचा ताबा घेत बियाणी यांना जिवे मारण्याची धमकी दिली. अपहरणकर्त्यांनी बियाणी यांना त्यांचे मित्र श्रेणिक घोडावत आणि भाऊ नितीन बियाणी यांना फोन करण्यास भाग पाडले. यावेळी अनुक्रमे ५ कोटी आणि १ कोटी रुपयांची खंडणी मागण्यासाठी दबाव टाकण्यात आला.

खंडणीची मागणी पूर्ण न झाल्याने, आरोपींनी बियाणी यांच्या कारच्या डिकीतील १० लाख ३५ हजार ७०० रुपयांची रोकड आणि गळ्यातील २ तोळ्यांची सोन्याची चेन (किंमत २ लाख) असा एकूण सुमारे १२ लाख ३६ हजारांचा ऐवज काढून घेतला. त्यानंतर बियाणी आणि चालकाला एका निर्जनस्थळी सोडून आरोपी पसार झाले. याप्रकरणी निकेत बियाणी यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संभाषणादरम्यान 'शुभम' आणि 'हरी' अशी दोन नावे फिर्यादीने ऐकली असून, त्यादिशेने पोलीस तपास करत आहेत. महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आधुनिक शेतीकडे नेणारा आशेचा मार्ग ; राज्यस्तरीय सेवागिरी कृषी प्रदर्शन बनले एक आशेचे केंद्र
पुढील बातमी
साताऱ्यात आज साहित्य संमेलनाच्या संमेलन गीत लोकार्पण सोहळा

संबंधित बातम्या