सातारा : अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या शाहूनगर परिसरामध्ये स्थानिक नागरिकांना बिबट्याचे दर्शन घडले. मंगळवारी रात्री तर चक्कबिबट्याची दोन पिल्ली येथील एका बांधकाम अर्धवट पडलेल्या इमारतीच्या परिसरातील कॉलनीत आढळून आली आहेत. पिल्लांना सोडून बिबट्याची मादी पसार झाली. वन विभागाने ही पिल्ली ताब्यात घेतली असून, त्यांना वन विभागाकडील रेस्क्यू सेंटरमध्ये सुरक्षित ठेवले आहे.
वन विभागाला याची माहिती मिळाल्यानंतर उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहायक वनसंरक्षक प्रदीप रौंदळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र संदीप जोपळे हे वनरक्षक राजाराम काशिद, मुकेश राऊळकर, अभिजित कुंभार, संभाजी दहिफळे, संजीवनी भोसले, तुषार लगड, वनपाल अरुण सोळंकी यांनी रात्रीच्या अंधारातच शाहूनगरकडे धाव घेतली. गुरुकुल स्कूलच्या मागच्या बाजूला अनेक दिवसांपासून अर्धवट बांधकाम झालेली इमारत आहे. या इमारतीच्या परिसरामध्ये झाडे, वेली वाढलेेल्या आहेत. या इमारतीला लागूनच कॉलन्या आहेत. येथील एकनाथ रेसिडेन्सीच्या परिसरात मंगळवारी रात्री बिबट्याचे पिल्लू स्थानिक नागरिकांना दिसून आले. त्यांनी तत्काळ याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जलद प्रतिसाद दल व प्राथमिक प्रतिसाद दलाच्या सदस्यांसह हे बिबट्याचे पिल्लू ताब्यात घेतले.
त्यानंतर या परिसरामध्ये सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. थर्मल ड्रोन उडवूनही पाहणी करण्यात आली. परंतु बिबट्याची मादी कुठेही आढळून आली नाही. मात्र, पाहणी सुरु असतानाच दुसरे बिबट्याचे पिल्लू वनविभागाला आढळून आले. ते पिल्लूही ताब्यात घेण्यात आले. त्यालाही रेस्क्यू सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान, ही दोन्ही पिल्ले साधारपणे 3 आठवडा वयाची आहेत. त्यांचे डोळे उघडले आहेत. तसेच ते चालू शकतात. मादीपासून ही पिल्ले भरकटून लोकवस्तीत घुसल्याची शक्यता आहे. पडक्या इमारतीच्या ड्रेनेज टाक्या कोरड्या आहेत. त्याच ठिकाणी मादी बिबट्या आश्रयाला थांबण्याची शक्यता आहे. मोठ्या नाल्यांचा अडथळा असल्याने या इमारतीत शिरता येत नसल्याचे चित्र आहे. त्यातच बिबट्याची पिल्ले पाहण्यासाठी गर्दी झाल्यानेही बिबट्याची मादी लपून बसली असण्याची शक्यता आहे.