रचना प्रॉपर्टी एक्स्पो 2024 : बिल्डर्स असोसिएशन सातारा शाखेचा अभिनव उपक्रम

by Team Satara Today | published on : 25 December 2024


सातारा : बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखेने दि. 2६ ते 2९ डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठया बांधकाम विषयक प्रदर्शनाचा शुभारंभ आज दि. २६ डिसेंबर रोजी सयांकाळी ५ वाजता विविध मान्‍यवरांच्‍या हस्‍ते होत आहे. यानिमित्त बिल्डर्स असोसिएशनच्या सातारा शाखेचा घेतलेला आढावा...

सातारा ! पश्चिम महाराष्ट्रातील एक शहर. सुमारे 7 दशकांपूर्वीपर्यंत या शहराची ओळख छत्रपती शिवरायांच्या वंशजांची राजधानी आणि निवृत्तीनंतर निसर्गरम्य वातावरणात आणि शांतपणे राहण्याचे एक ठिकाण अशीच होती. कृष्णा-कोयनेच्या पाण्याने सुजलाम सुफलाम झालेल्या या भूमीने कात टाकत आधुनिकतेची पाऊले टाकायला सुरूवात केली.

बदलती काळाची गरज लक्षात घेऊन सातार्‍यातील बांधकाम व्यावसायीकांनी, बिल्डर्स असोसिएशन इंडिया ची शाखा साताऱ्यात तीन दशकापूर्वी म्हणजेच 1989 रोजी सुरु केली. आज रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात बिल्डर्स असोसिएशनचे सातारा सेंटर 3४ व्या वर्षात यशस्वी वाटचाल करीत आहे.

सुरूवातीस बांधकाम व्यावसायिकांच्या अडचणी सोडवणे, सभासदांना बांधकाम विषयक नवीन तंत्रज्ञान, नव्या संकल्पना आणि नवीन पध्दती याविषयी माहिती देणे, यासाठी चर्चासत्रे, कार्यशाळा यांचे आयोजन करणे असा कार्यक्रम होता. जसजसे दिवस जाऊ लागले तसे बांधकाम व्यवसायिकांव्यतिरिक्त सामाजिक जाणिवेच्या भावनेतून विविध उपक्रम राबविण्यात येऊ लागले. पहिल्यांदा केवळ हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या सभासदांनी सुरू झालेली बिल्डर्स असोसिएशनची सातारा शाखा आज भारतातील सर्वात जास्त मेंबर्स असलेल्या प्रमुख शाखांपैकी एक आहे.

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया च्या सातारा शाखेची वाटचाल सुवर्णाक्षराने लिहावी अशीच आहे. बांधकाम क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक यंत्रसामुग्री यांची माहिती आपल्या सदस्यांना व्हावी आणि जगाच्या बरेबरीने राहता यावे यासाठी सातारा शाखा अनेक उपक्रम राबविते. यामध्ये विविध विषयांवरील टेक्नीकल सेमीनारचे आयोजन, निरनिराळ्या स्टील, सिमेंट आणि अन्य कंपन्यांना प्रत्यक्ष भेटी देणे, प्रेझेंटेशन्स इत्यादींचा समावेश यामध्ये असतो. याशिवाय बांधकाम क्षेत्रातील नवनवीन तंत्रझान आत्मसात करण्यासाठी वैशिष्ठपूर्ण बांधकाम साईटसचा पाहणी दौराही केला जातो. यामधून सभासदांना आधुनिक तंत्राचे प्रत्यक्ष ज्ञानच आत्मसात करता येते.

केवळ व्यवसायापुरतेच न राहता आपले समजासाठीही काही देणे लागते या सामाजिक बांधिलकीतून, बीएआयची सातारा शाखा अनेक सामाजिक उपक्रम राबवित असते. अभियंता दिनाचे औचित्य साधून दरवर्षी वृध्दाश्रम आणि मतिमंद मुलांच्या शाळेला दिली जाणारी मदत हि गेली 3३ वर्षे अव्याहतपणे सुरु आहे. याबरोबरच शहरातील इंजिनिअरींग कॉलेजमधील वेगवेगळया शाखातील विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे भरघोस पारितोषिके देऊन कौतुक करणे,  कार्यकारी क्षेत्रात नव्याने प्रवेश  करणार्‍या अभियंत्यांना मार्गदर्शन करण्यासाठी यशस्वी उद्योजकांची मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करणे हा उपक्रम आजतागायत अखंड चालू आहे. यामुळे अभियांत्रिकी क्षेत्रात कार्य करणारे अभियंते आणि होतकरू अभियंते यांच्यात एक समन्वय साधला जाऊन एक दुवा निर्माण करण्याचे काम संस्थेमार्फत सहजपणाने घडते आहे. 

सातारा शाखेने 2001 साली अहमदाबाद आणि भूज मधील भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी स्वयंप्रेरणेने भरघोस निधी देवून मदतीचा हात पुढे केला. तीच गोष्ट सुनामीग्रस्तांसाठीही केली गेली. सांगली, कोल्हापूर, चिपळूण या भागात पुराने थैमान घातले, त्यावेळी बिल्डर्स असोसिएशनने त्या भागातील नागरिकांना मदत पुरवली. कोरोनाच्या अतिशय बिकट परिस्थीततही बीएआयच्या सातारा सेंटरने भरीव काम केले आहे. यामध्ये नागरिकांना अन्नधान्याचे वाटप, जंबो कोविड सेंटरच्या स्वच्छतेचे काम, व्हॅक्सीनेश कॅम्पस् चे आयोजन, मास्क वापरण्याबद्दलचे सामाजिक भान अशी एक ना विविध कार्ये केली. शिवाय कामगारांच्या सुरक्षिततेचा विचार करून बांधकाम क्षेत्रातील जोखमीचे काम करणार्‍या कामगारांना संस्थेतर्फे हेल्मेट पुरवण्यात आली.

बीएआय सातारा शाखेने आपले कार्यक्षेत्र केवळ सातारा शहरापुरतेच मर्यादित न ठेवता जिल्ह्यातील बांधकाम व्यावसायिक आणि  स्थापत्य अभियंत्यांसाठी मंथन ही कार्यशाळा आयोजित करते. तसेच या प्रसंगी क्षेत्रातील  विविध तज्ञांचे बांधकाम विषयक लेख असलेली स्मरणिका प्रसिध्द करते. बांधकाम क्षेत्राला उपयुक्त होतील अशा नव्या कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी जिज्ञासा किंवा संकल्पना शोध स्पर्धा घेण्यात येतात. ही स्पर्धा तीन गटात विभागली आहे. पहिला गट -  व्यावसायिक, दुसरा गट -  महाराष्ट्रातील इंजिननिअरींग कॉलेजचे विद्यार्थी आणि तिसरा गट - समाजातील कुठलाही घटक.

मंथन आणि जिज्ञासा या दोन्ही उपक्रमांना पश्चिम महराष्ट्रातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

बीएआय सातारा शाखेचे गौरव -  

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखेचा डंका नेहमीच संपुर्ण देशभर वाजला आहे. साताार सेंटरच्या विविध वैशिष्ठपूर्ण कामांमुळे सातारा सेंटरचा देशभर गौरव होत असतो. याचेच फलित म्हणून सातारा सेंटरचे श्री विजय देवी यांची नॅशनल ट्रस्टी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. याशिवाय महाराष्ट्र राज्याचे स्टेट चेअरमन म्हणून सुधीर घार्गे व सचिन देशमुख तसेच राज्याच्या कार्यकारिणीवर श्रीराज दिक्षीत व मंगेश जाधव यांची निवड झाली होती. बीएआय सातारा शाखेला आजपर्यंत राज्य आणि देशपातळीवरील अनेक सन्मान प्राप्त झालेले आहेत. यामध्ये सर्वोत्कृष्ट शाखेचे राज्य आणि देश पातळीवरील गौरव, सर्वात जास्त मेंबरशीप डेव्हलपमेंट अॅवार्ड, याशिवाय अनेक मान-सन्मानांनी संपूर्ण देशभर सातारा शाखेचा गौरव झाला आहे.

सातारा शाखेचा पदग्रहण समारंभ हा तर संपुर्ण देशभर नावाजलेला सोहळा असतो. डोळे दिपवून टाकणार्‍या या सोहळयाला दरवर्षी राज्य आणि देश पातळीवरील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांची हमखास उपस्थिती असतेच. सातारा शाखेने आजपर्यंत अनेक स्टेट मिटींग्जचेही उत्कृष्ठ आयोजन केलेले आहे.

बिल्डर्स असोसिएशनच्या सातारा शाखेचा सर्वात मोठा उपक्रम म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे बांधकाम विषयक प्रदर्शन - रचना. दर दोन वर्षांनी होणाऱ्या रचना या प्रदर्शनाची संपुर्ण महाराष्ट्राला आस लागून राहिलेली असते. प्रदर्शनात सातारा, पुणे, कोल्हापूर, कराड व अन्य शहरांमधील नामवंत बिल्डर्स यांचा सहभाग वाढत जावून  आता याची व्याप्ती 120 स्टॅाल्स पर्यंत  गेली आहे. यामध्ये रेसिडेन्शीयल, कमर्शिअल, प्लॉटींग प्रकल्प, अंतर्गत सजावट, बांधकाम मटेरियल व तंत्रज्ञान यांची माहिती नागरिकांना एकाच छताखाली उपलब्ध होत असते. चार दिवस चालणार्‍या या प्रदर्शनाला सुमारे दोन लाख लोक भेट देतात. यामधून 100 कोटींपेक्षा जास्त उलाढाल होते. बिल्डर्स असोसिएशन सातारा शाखेने आजपर्यंत 1३ यशस्वी रचना प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करणाऱ्या बिल्डर्स असोसिएशनच्या सातारा शाखेची वाटचाल भविष्यातही अशीच सुरू राहील आणि शाखेच्या यशाचा वेलू असाच गगनावर जावो, याच शुभेच्छा !

- श्री. सुधीर ठोके,

अध्यक्ष,

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखा.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
पुढील बातमी
जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवा

संबंधित बातम्या