कोल्हापूर मंडळाने उभारलेले 'बोर्ड परीक्षेचा राजमार्ग'' नवे मॉडेल

by Team Satara Today | published on : 13 October 2025


कोल्हापूर : दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा म्हंटले की जितकी चिंता विद्यार्थी-पालकांना असते त्याहून जास्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक व कर्मचारी ताण-तणावाखाली असतात. परीक्षा घेण्यापासून ते हॉलतिकीट, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका अन् निकाल लावेपर्यंतचा ताण शिक्षकांना येतोच. मात्र, कोल्हापूर विभागीय मंडळाने याच दहावी-बारावी परीक्षेच्या प्रशासकीय व शैक्षणिक कामकाजाची सुसूत्रता आखत 'बोर्ड परीक्षेचा राजमार्ग'' हे नवे मॉडेल पुस्तिकेच्या माध्यमातून उभारले आहे.

कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकाराने तयार केलेल्या या मॉडेलची सध्या राज्यभर चर्चा आहे. शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना वर्षभराच्या प्रशासकीय व शैक्षणिक कामकाजाचे महिनानिहाय, सूत्रबद्ध नियोजन देणारे मॉडेल या पुस्तिकेत मांडले आहे.

कामाचे ‘प्रथम सत्र’ (दिवाळीपूर्वी) आणि ‘द्वितीय सत्र’ (दिवाळीनंतर) असे स्पष्ट विभाजन केले आहे. प्रथम सत्रात कामे प्रयत्नपूर्वक पूर्ण करणे अपेक्षित आहे, तर द्वितीय सत्रात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा आग्रह आहे. ऑनलाइन अर्ज भरणे, सप्टेंबरमध्ये आवेदनपत्रे भरण्यापूर्वी ऑनलाइन टेम्प्लेटचा सराव करण्याची सूचना, तसेच ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये प्रि-लिस्ट तपासणी व दुरुस्तीवर भर देणे, यातून कामात अचूकता येणार आहे.

शाळा प्रोफाइल, सांकेतांक नूतनीकरण आणि शिक्षक पॅनेल सादर करणे ही कामे वेळेत पूर्ण करण्याची सक्ती आहे. जानेवारीमध्ये अंतर्गत मूल्यमापन आणि प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षांचे गुण ऑनलाइन भरणे या प्रक्रिया पूर्ण केल्याने ऐनवेळी बोर्डावर पडणारा ताण कमी होतो. ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत अभ्यासक्रम पूर्ण करण्याची कालमर्यादा निश्चित केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना उजळणीसाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.

कोल्हापूर विभागीय मंडळाचा ‘बोर्ड परीक्षेचा राजमार्ग’ हा उपक्रम कठोर परिश्रम, शिस्तबद्ध नियोजन आणि विद्यार्थ्यांप्रति असलेली बांधिलकी यातून शिक्षणाचा मार्ग केवळ 'राजमार्ग' नाही, तर 'यशाकडे नेणारा ठरणार आहे. -राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळ.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कराड उत्तरमधील पाणंद रस्त्यांसाठी 7 कोटी : आ. मनोज घोरपडे
पुढील बातमी
आहारात करा 'या' भाज्यांचा समावेश

संबंधित बातम्या