सातारा : लोकसभा विधानसभांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्यानिवडणुकांमध्ये नागरिकांनी महायुतीला कौल दिला आहे केंद्रातही आणि राज्यातही माहितीचे सरकार आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत स्थानिक समीकरणाच्या संदर्भाने नक्की काय घडले याची मला माहिती नाही. एकमेकांवर टोकाची टीका करायची नाही असे ठरले होते. मात्र कौल हा महायुतीलाच आहे, असे स्पष्ट प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
दरे येथील दौऱ्यावर असणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. त्यांच्याशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत चौथ्या क्रमांकाची महासत्ता बनत आहे. 2014 पूर्वी आम्ही अशी परिस्थिती पाहिली नव्हती. दिल्लीमध्ये एआय समिट परिषदेत लाखो कोट्यावधी रुपयाची गुंतवणूक झाली. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅकौंनरीहे भारताच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी सुद्धा महत्त्वाचे गुंतवणूक करार झाले. अशा परिषदेत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करणे हे राहुल गांधी यांच्या विकारी मानसिकतेचे लक्षण आहे. त्यांचे हे माकड चाळे आणि काँग्रेस सदस्यांनी केलेल्या टीकेचा शिवसेना पक्षाध्यक्ष म्हणून मी निषेध करतो.
देशात व राज्यात महायुतीला कौल मिळालेला आहे. त्यामुळे सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमधील स्थानिक समीकरणे काय आहेत आणि त्यावर काय टीका झाली हे मला माहीत नाही. महायुतीमध्ये घटक पक्षांच्या प्रतिनिधींनी एकमेकांवर टोकाची टीका करायची नाही असे ठरले होते पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची दमदार पद्धतीने वाटचाली सुरू आहे. राज्यातही महाराष्ट्र विकासाच्या प्रगतीपथावर आहे. जनतेचा कौल जर महायुतीला असेल तर महायुतीच्या संदर्भात चर्चेनेच हे प्रश्न सोडवले जातील असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील नंदनवन बंगल्यावर ग्रामविकास मंत्री मकरंद पाटील, पालकमंत्री शंभूराज देसाई व स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना व राष्ट्रवादी युती संदर्भात बैठक झाल्याची चर्चा होती या प्रश्नावरून छेडल्या असता एकनाथ शिंदे म्हणाले, आमची बैठक झाली असे त्यांनी तुम्हाला सांगितले आहे का ? बैठक झाली असेल तर तुम्ही त्यांना विचारा. मला तर बंगल्यावर शेकडो माणसे भेटायला येतात. माहितीच्या घटक पक्षांनी बरेचसे प्रश्न चर्चेने सोडवलेले आहेत असे सांगत एकनाथ शिंदे यांनी महायुती मधील वाढते डॅमेज कंट्रोल कमी करण्याचा प्रयत्न केला.
पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या पुढाकाराने होऊ घातलेला कोयना महोत्सव होणार आहे. मात्र येत्या उन्हाळ्यात घेणे तो अशक्य आहे. सातारा जिल्ह्यातील निसर्ग आणि येथील पर्यटन या दृष्टीने स्थानिकांना रोजगार मिळणे गरजेचे आहे. कोकण व पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा पूल जोर जांभळी येथे होत आहे. त्यामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे त्यामुळे स्थानिक समीकरणांच्या चर्चा या समन्वयक वाटाघाटीतून पार पाडल्या जातील असे एकनाथ शिंदेने स्पष्ट केले.