सातारा : शहरातील केसरकर पेठ परिसरात कर्जाच्या पैशांवरून वाद होऊन घरात घुसून तोडफोड व धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल अनिल जाधव (रा. केसरकर पेठ, सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. २७ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे ९.०० वाजण्याच्या सुमारास संशयित पवन दत्तात्रय जाधव (रा. केसरकर पेठ, सातारा) हा फिर्यादीच्या घरी आला. त्याने “माझे २००० रुपये दे, अन्यथा नाक्यावर ये, तुझे हातपाय मोडून गळ्यात टाकीन,” अशी धमकी दिली व तेथून निघून गेला.
त्यानंतर त्याच दिवशी सकाळी ११.३० ते दुपारी १.३० या वेळेत फिर्यादी घरात नसताना, संशयित पवन जाधव व त्याच्या सोबत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने घरात जबरदस्तीने प्रवेश केला. त्यांनी मुख्य दरवाजा कोणत्यातरी साधनाने तोडून घरातील साहित्याची तोडफोड करत वस्तूंची फेकाफेक करून नुकसान केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस हवालदार पवार हे पुढील तपास करत आहेत.