कास परिसरातील पाली गावात ५० किलो गांजा जप्त; तालुका पोलिसांची कारवाई; गव्हाच्या आंतर पीकात आढळली रोपे

by Team Satara Today | published on : 08 January 2026


सातारा  : सातारा तालुका पोलिसांनी कास परिसरातील पाली गावात थेट कारवाई करत गव्हाच्या पिकात लपवून लावलेले गांजाचे आंतरपीक जप्त केले आहे . या कारवाईत अंदाजे ३० गुंठे क्षेत्रात लागवड केलेला सुमारे ५० किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला असून, एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पाली गावाच्या हद्दीत गव्हाच्या पिकामध्ये गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती तालुका पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांना मिळाली. त्यानुसार डीबी पथकाने संबंधित शेतात छापा टाकला असता गव्हाच्या पिकात लपवून गांजाचे आंतरपीक घेण्यात आल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांनी तत्काळ पंचनामा करून गांजाची झाडे उपटून जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या गांजाचे अंदाजे वजन सुमारे ५० किलो असून, त्याची बाजारभावानुसार मोठी किंमत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या प्रकरणी नामदेव लक्ष्मण माने(वय ४२ वर्ष राहणार पाली, ता जिल्हा सातारा) या संशयितास ताब्यात घेण्यात आले असून,त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या धडक कारवाईमुळे तालुका पोलिसांच्या कार्यपद्धतीचे नागरिकांकडून कौतुक होत असून,अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायाविरोधात पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील तपासात या गांजा लागवडीमागे आणखी कोणी सहभागी आहे का, याचा शोध घेतला जात आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शासकीय ठिकाणी नोकरी लावण्याच्या बहाण्याने १ लाख २७ हजार रुपयांची फसवणूक; एका विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा
पुढील बातमी
शिवरायांच्या गडकोटांचे संवर्धन करण्याची जबाबदारी तरुणाईवर - प्रा. सूर्यकांत अदाटे; अजिंक्यतारा किल्ल्यावर श्रमसंस्कार शिबिरात मार्गदर्शन

संबंधित बातम्या