बोरगाव येथील ममता डेअरीकडून दूध उत्पादकांची कोट्यवधींची थकबाकी; संकलन करणारे एजंट व शेतकरी गंभीर आर्थिक संकटात, दूध उत्पादकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

by Team Satara Today | published on : 16 December 2025


सातारा : बोरगाव येथील ममता मिल्क अ­ॅण्ड मिल्क प्रॉडक्ट प्रा. लि., या डेअरीकडून दीर्घकाळापासून दूधबिल अदा न झाल्याने दूध संकलन करणारे एजंट व शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले असून, या प्रकरणामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. संबंधित पुरवठादारांनी याबाबत लेखी अर्ज देत प्रशासनाने तातडीने दखल घेण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदनाद्वारे केली आहे. 

यावेळी  सदाशिव महाडीक, प्रदीप जाधव, सुजित निकम, श्रीमंत घाडगे, राहुल कदम, रामदास बागल, समीर विभुते, किरण तरडे, संतोष निकम, विठ्ठल सावंत, अवधूत वाघ, प्रदीप गायकवाड, वैभव साबळे, विजय जगताप आदी उपस्थित होते.

दिलेल्या अर्जात नमूद केल्याप्रमाणे, बोरगाव येथील ममता डेअरीला नियमित दूधपुरवठा करण्याचे काम पाच ते दहा वाड्यांमधून सुमारे १५० ते २०० शेतकऱ्यांकडून दूध संकलन करून करण्यात येत होते. संकलित दूध कंपनीकडे पुरवठा करण्यात येत असून, सुरुवातीच्या काळात कंपनी व्यवस्थापनाने दूधबिलाची रक्कम वेळेत बँक खात्यात जमा केली होती. ती रक्कम संबंधित शेतकऱ्यांना वेळेवर देण्यात येत होती. मात्र दि. १ ऑगस्ट २०२३ ते २० ऑक्टोबर २०२३ तसेच दि. १ फेब्रुवारी २०२३ ते ३० मार्च २०२४ या कालावधीत पुरवठा केलेल्या दुधाचे बिल अद्याप अदा करण्यात आलेले नाही. याबाबत वारंवार ममता डेअरीच्या संचालकांशी प्रत्यक्ष भेटी व फोनद्वारे संपर्क साधूनही, ''कंपनी आर्थिक अडचणीत आहे, लवकरच पैसे देतो'' असे सांगत वेगवेगळ्या तारखा देण्यात आल्या. मात्र, दि. १६ डिसेंबर  अखेरही एक रुपयाही अदा करण्यात आलेला नाही.

संबंधितांनी यापूर्वीही दि. २१ जानेवारी २०२४ रोजी अर्ज सादर केला होता. मात्र त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आता प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून ७ दिवसांच्या आत निर्णय घ्यावा व दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कार्यवाही न झाल्यास आम्हाला कोणताही कठोर निर्णय घ्यावा लागू शकतो, असा इशाराही अर्जात देण्यात आला असून, या गंभीर प्रकरणाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहावे, अशी विनंती दूधपुरवठादार व शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्ह्यातील 625 महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; मावळ तालुक्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या अवैध निलंबनाचा केला निषेध
पुढील बातमी
शाहूपुरी पोलिसांचा राजवाडा परिसरात जुगाराच्या अड्ड्यावर छापा; २५ हजाराचे साहित्य जप्त

संबंधित बातम्या