नवी मुंबई विमानतळ २५ डिसेंबरपासून 'टेक ऑफ'साठी सज्ज; इंडिगोच्या थेट १० शहरांसाठी फ्लाईट्स

by Team Satara Today | published on : 16 November 2025


नवी मुंबई : साताऱ्यासह संपूर्ण महाराष्ट्राची प्रतीक्षा संपवत, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येत्या २५ डिसेंबर रोजी औपचारिकपणे प्रवासी सेवेसाठी सुरू होणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील हे दुसरे विमानतळ पश्चिम महाराष्ट्रासाठी 'प्रवासाचे नवे द्वार' ठरणार आहे. सुरुवातीला इंडिगो आणि आकासा एअर या दोन प्रमुख कंपन्यांनी आपले सविस्तर वेळापत्रक जाहीर केले आहे तर इंडिगो एअरलाईन्सने पहिल्या टप्प्यात देशभरातील थेट १० प्रमुख शहरांसाठी उड्डाणांची घोषणा केली आहे.

• सुरुवातीची योजना: इंडिगो दररोज १८ उड्डाणे (36 आगमन-निर्गमन) करणार आहे.

• विस्तार योजना: मार्च २०२६ पर्यंत ही संख्या १०० हून अधिक करण्याची कंपनीची महत्त्वाकांक्षी योजना आहे, यात आंतरराष्ट्रीय उड्डाणांचाही समावेश असेल.

आकासा एअर पहिली फ्लाईट 'दिल्ली-नवी मुंबई'

आकासा एअर या विमानतळावर सेवा सुरू करणाऱ्या कंपन्यांपैकी एक असेल.

• पहिली फ्लाईट: २५ डिसेंबर रोजी पहाटे ५:२५ वाजता दिल्लीहून निघून सकाळी ८:१० वाजता नवी मुंबईत उतरेल.

• इतर शहरे: दिल्ली व्यतिरिक्त गोवा (मोपा), कोची आणि अहमदाबाद या शहरांसाठी आकासाची सेवा उपलब्ध होणार आहे.

• तिकीट बुकिंग: दोन्ही कंपन्यांनी त्यांच्या वेबसाईटवर तिकीट बुकिंग सुरू केले आहे.

NMI विमानतळाची खास वैशिष्ट्ये:

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे अत्याधुनिक सुविधांनी युक्त आहे, जे प्रवासाचा अनुभव सुलभ करेल

• जल वाहतूक हे विमानतळ वॉटर टॅक्सीने जोडले जाणारे भारतातील पहिले विमानतळ ठरणार आहे.

• पर्यावरणापूरक : इथे अंदाजे ४७ मेगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती केली जाईल आणि पर्यावरणपूरक 'ईव्ही बसेस'ची सुविधा असेल.

• क्षमता: पहिल्या टप्प्यात दररोज अंदाजे १०० ते ११० उड्डाणे होणार आहेत. भविष्यात हे विमानतळ वर्षाला ९० दशलक्ष प्रवासी हाताळण्यास सक्षम असेल.

साताऱ्यासह पश्चिम महाराष्ट्राला फायदा:

हे विमानतळ पनवेलजवळ असल्याने सातारा, पुणे, रायगड आणि कोकणातील हजारो प्रवाशांचा मुंबई विमानतळावरील गर्दीतून होणारा प्रवास वाचणार आहे. बंगळूर, नागपूर, गोवा आणि जयपूरसारख्या ठिकाणी थेट आणि जलद प्रवास करणे यामुळे शक्य होईल.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फलटण पालिका निवडणुकीसाठी तीन अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी एक, नगरसेवकपदांसाठी दोन उमेदवारी अर्ज
पुढील बातमी
'हे' ३ बदल लघवीत दिसताच सावध व्हा! वेळीच लक्ष न दिल्यास गंभीर परिणाम होतील

संबंधित बातम्या