सातारा : सातारा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्यासहित सर्व उमेदवारांना निवडून द्या.सातारा शहराचा चेहरा मोहरा बदलतो आणि खड्डे मुक्त सातारा शहर करून दाखवतो असे आश्वासन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.
सातारा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी खा. उदयनराजे भोसले आणि ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे. या दोघांच्या माध्यमातून सातारा शहराचा कायापालट होत आहे. दोघांच्या नेतृत्वाखाली सातारा नगर पालिकेत भाजपचीच सत्ता येणार, असा एकमुखी निर्धार गोडोली परिसरातील नागरिकांनी केला.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहिते, नगरसेवक पदाचे उमेदवार शेखर मोरे पाटील, अनिता फरांदे यांच्या प्रचारार्थ कामाठीपुरा, संत गाडगेबाबा मठ, कोलाटी वस्ती, हॉस्पिटल, गोडोली बाग, अजिंक्यतारा स्वागत कमान, मेहरबान आळी, भैरवनाथ मंदिर, चव्हाटा, गोडोली जकात नाका, शिवनेरी कॉलनी, बीएसएनएल ऑफिस या मार्गावर पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेला गोडोली व परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नागरिकांनी ना. शिवेंद्रसिंहराजे व सर्व उमेदवारांचे जल्लोषी स्वागत केले. तसेच सर्वांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा निर्धार केला.
सातारा शहरात सर्व प्रकारची विकासकामे मार्गी लावली आहेत. नागरिकांच्या मागणीनुसार कामे करण्यास प्राधान्य दिले आहे. विरोधक केवळ निवडणुकीपुरते उगवतात, त्यामुळे मतदारांनी विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता कमळ या चिन्हापुढील बटन दाबून भाजपच्या सर्व उमेदवारांना विक्रमी मतांनी विजयी करावे आणि सातारा शहराचा विकासात्मक कायापालट अखंडित ठेवावा, असे आवाहन ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी याप्रसंगी केले.